नागपूर : उपराजधानीतील वनखात्याचे मुख्यालय पुन्हा मुंबईला पळवण्याचा घाट घातला जात आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव देखील तयार असून मंत्रालय स्तरावरून हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. यापूर्वीदेखील तत्कालीन वनमंत्री दिवंगत पतंगराव कदम यांच्या काळात हे कार्यालय पुण्यात हलवण्याचा घाट घालण्यात आला होता. आता पुन्हा हीच चर्चा सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख), त्यांच्या अंतर्गत असलेले प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्मिक व दुय्यम संवर्ग आणि विशेषकरून नोडल अधिकारी (एफसीए) (विविध वनेत्तर उपयोगासाठी जमीन वाटप करणारे कार्यालय) ही प्रमुख कार्यालये मुंबईला स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव तयार आहे. त्यावर आता संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या होणे बाकी आहे. वनबलप्रमुख हे राज्याच्या वनखात्याचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या कार्यालयाचे स्थलांतर होणे म्हणजे मुख्यालय स्थलांतरित करणे,  असा त्याचा अर्थ काढला जातो.

हेही वाचा >>> अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणारा चंद्रपुरातून हद्दपार; मुनगंटीवारांच्या उपस्थितीत केला होता भाजपात प्रवेश

 नियोजन आणि विकास विभागाचे नुकसान भरपाई देणारी वनीकरण निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरणमध्ये विलीन करण्याची योजना देखील सुरू आहे. संरक्षण आणि आयटी विभागही विलीन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यालयातील वनकर्मचाऱ्यांमध्ये घबराट उडाली आहे.  जमिनीचे प्रकल्प मोकळे करण्यासाठी हे कार्यालय मुंबईला नेण्याचा घाट काहींनी घातल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली तर काहींनी भारतीय वनसेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोठ्या शहरात नियुक्ती हवी असल्याने त्यांनी हा घाट घातला असावा, अशीही प्रतिक्रिया नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली. सध्या वनखात्यात सहाय्यक वनसंरक्षक दर्जाचे अधिकारी, विभागीय वनाधिकारी अशी अनेक पदे रिक्त असल्याने विलीनीकरणाचा मार्ग अवलंबला असावा, असेही काहींनी सांगितले. दरम्यान, या स्थानांतरणावर वनखात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मात्र प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा >>> संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन

एप्रिलचा मुहूर्त?

नागपूरला उपराजधानीचा दर्जा देण्यात आला तेव्हाच काही विभागाची मुख्यालये ही नागपुरात असावी, असा आग्रह धरला होता. आधी वनखात्याचे मुख्यालय पुण्यात होते. तत्कालीन वनमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या कार्यकाळात एप्रिल १९८७ मध्ये ते नागपुरात हलवण्यात आले. त्यानंतर तत्कालीन वनमंत्री दिवंगत पतंगराव कदम यांच्या कार्यकाळात हे मुख्यालय पुण्यात हलवण्याचा हालचाली सुरू झाल्या. त्यात त्यांना यश आले नाही. आता पुन्हा हे मुख्यालय मुंबईत हलवण्याचा प्रस्ताव तयार झाला असून एप्रिल २०२३ मध्ये ते मुंबईत स्थानांतरित होण्याची दाट शक्यता वनखात्यातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Move the headquarters to the capital proposal prepared movement started in the ministry rgc 76 ysh
First published on: 28-01-2023 at 14:57 IST