चंद्रपूर : राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना दिल्ली येथील वेदांता रुग्णालयात कृत्रिम श्वासावर ठेवण्यात आले आहे. रविवारी खासदार धानोरकर यांची प्रकृती खालवल्याने त्यांना नागपूर येथील अरिहंत रुग्णालयातून विशेष एअर अॅम्बुलन्सद्वारे पुढील उपचारासाठी वेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते. २७ मे रोजी खा. धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले होते. मात्र, प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे ते वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित नव्हते. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून धानोरकर यांच्यावर नागपुरातील अरिहंत या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ‘किडनी स्टोन’वर शस्त्रक्रिया केल्यानंतर पोटात दुखू लागल्याने तपासणीसाठी दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल येथे नेण्यात आले. तिथे त्यांची प्रकृती अधिक खालावली आहे. मध्यरात्री ३ वाजता त्यांना कृत्रिम श्वासावर ठेवण्यात आले आहे. सध्या खासदार धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, रविवारी खासदार धानोरकर यांनी, माझी प्रकृती स्थिर असून, कार्यकर्त्यांनी घाबरू नये किंवा भयभीत होऊ नये. वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील काही दिवस तपासणी, उपचार आणि विश्रांती घेणार असे सांगितले होते. हेही वाचा - नागपूर : विद्युत प्रकल्पांमधील राख ही किरणोत्सर्गी तरीही लोकवस्तीजवळ प्रकल्पाचा अट्टाहास का ? अफवा पसरवून नका धानोरकर यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर कोणतीही अफवा पसरवू नये. शिवाय कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवून भयभीत होऊ नये. धानोरकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन निरोगी आरोग्य लाभावे, यासाठी प्रार्थना करू या, असे आवाहन खा. धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.