भंडारा : भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी शिरपूर (देवरी) आंतरराज्यीय आरटीओ तपासणी नाक्यावर आपल्यावर आणि सहकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याचा खळबळजनक आरोप भंडारा येथील पत्रकार परिषदेत केला आहे.

खासदार पडोळे यांनी सांगितले की, २८ फेब्रुवारी २०२६ च्या रात्री देवरी तालुक्यातील शिरपूर (महाराष्ट्र-छत्तीसगड सीमा) येथील आरटीओ तपासणी नाक्याला त्यांनी अचानक भेट दिली. तेथे ट्रकचालकांकडून बेकायदेशीरपणे पैसे उकळले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

या कारवाईदरम्यान आरटीओ कर्मचारी आणि त्यांच्या संगनमताने असलेल्या काही स्थानिक लोकांनी त्यांच्यावर व त्यांच्या सहकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याचा दावा खासदारांनी केला आहे.

खासदार पडोळे यांनी आरोप केला की, आरटीओ अधिकाऱ्यांनी वसुलीसाठी काही स्थानिक लोकांना कामावर ठेवले आहे. जेव्हा त्यांनी या प्रकाराला विरोध केला, तेव्हा त्यांना व त्यांच्या समर्थकांना स्थानिक नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

त्यांनी सांगितले की, २८ फेब्रुवारीच्या रात्री महाराष्ट्र-छत्तीसगड आंतरराज्यीय सीमेवरील शिरपूर येथील तपासणी नाक्यावर ट्रक चालकांकडून कथित अवैध वसुली होत असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर ते तेथे पोहोचले होते. हा त्यांचा तिसरा दौरा होता. मात्र यावेळी त्यांच्यावर व त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला.

या संदर्भात त्यांनी देवरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे सांगितले. तसेच गोंदिया जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन संपूर्ण वसुली यंत्रणेची माहिती देत कारवाईची मागणी केली.

खासदार डॉ. पडोळे यांनी आरोप केला की, तपासणी नाक्यावर स्टॅम्प शुल्काच्या नावाखाली प्रति ट्रक ५०० ते १५०० रूपये रोख रक्कम वसूल केली जाते आणि त्याचा कोणताही लेखाजोखा ठेवला जात नाही. प्रत्येक तासाभराने ही रक्कम पोत्यांमध्ये भरून अन्य ठिकाणी पाठवली जाते. विरोध करणाऱ्यांना धमकावण्यासाठी स्थानिक लोकांना लाठ्यांसह उभे केले जाते, असा दावाही त्यांनी केला.
शनिवारी रात्री घटनेच्या वेळी आरटीओ अधिकारी वानखेडे आणि भगत उपस्थित असल्याचा आरोप त्यांनी केला. शिरपूरपासून भंडारा, गोंदिया, मुंबई आणि दिल्लीपर्यंत या कथित सिंडिकेटविरोधात लढा देणार असून मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

खासदार पडोळे यांच्या या भूमिकेनंतर आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार पडोळे यांना समज देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन पाठविले आहे. पुराम यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, खासदार पडोळे यांनी भेट दिली ते माझे कार्यक्षेत्र असल्यामुळे नियमीत सीमा तपासणी नाका, शिरपूर येथे भेट देत असतो. भेटी दरम्यान मला कधीही त्याठिकाणी अशासकीय कामकाज होत असल्याचे निदर्शनास आले नाही. तसेच कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी नेहमी गणवेश धारण करूनच कर्तव्य बजावत असतात, मी या क्षेत्रातून आमदार असून गडचिरोली लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये हे ठिकाण आहे. त्यामुळे प्रशांत पडोळे यांनी विनाकारण भारतीय जनता पक्षाची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले आहे. यामुळे विभागाची व शासनाची प्रतिमा मलीन होत असल्याने खासदार पडोळे यांना समज देण्यात यावी असे निवेदन आमदार संजय पुराम यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे.