भंडारा : दिल्लीतील संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी परिधान केलेल्या संदेशात्मक कुर्त्याने बुधवारी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. “सिमेंट सडक नीती बंद करा, जनतेचा आवाज बुलंद करा” असा थेट संदेश कुर्त्यावर झळकवत त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले.

यावेळी त्यांनी भंडारा-गोंदियातील राष्ट्रीय महामार्गांची दुरवस्था, निकृष्ट दर्जाचे सिमेंट रस्ते, जीवघेणे खड्डे आणि E20 पेट्रोलबाबतही केंद्र सरकारसमोर आक्रमक भूमिका मांडली. संसद भवनासमोर या अनोख्या आंदोलनाची चर्चा पावसाळी अधिवेशनादरम्यान संसद भवनात प्रवेश करताना खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी अंगावर घातलेल्या पांढऱ्या कुर्त्यावर लाल अक्षरात छापलेला संदेश सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. संसद परिसरात उपस्थित खासदार, अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधींमध्ये या अनोख्या आंदोलनाची चर्चा रंगली.

लोकप्रतिनिधीने थेट अंगावरच जनतेचा आवाज मांडल्याने हा प्रकार विशेष ठरला. गडकरींसमोर भंडारा-गोंदियाच्या रस्त्यांचा प्रश्न डॉ. पडोळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग, उड्डाणपूल आणि सिमेंट रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने दररोज अपघात होत असून नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, दोषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि दर्जेदार रस्ते बांधकामालाच प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

एनएचएआय (NHAI) वरही थेट आरोप

खासदार पडोळे यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही भंडारा-गोंदिया मतदारसंघातील मुख्य रस्ते आणि पुलांवरील खड्ड्यांची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. लवकरच रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास नागरिकांसह मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

E – 20 पेट्रोलवरुन सरकारला घेरले

रस्त्यांच्या प्रश्नासोबतच डॉ. पडोळे यांनी E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापराबाबतही केंद्र सरकारकडे गंभीर आक्षेप नोंदविला. जबरदस्तीने E20 पेट्रोलचा वापर वाढविल्यामुळे अनेक वाहनांमध्ये बिघाड होत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील विविध संघटनाही E20 विरोधात आंदोलन करत असल्याचा उल्लेख करत E20 पेट्रोलचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, तसेच पेट्रोलच्या वाढत्या किंमती कमी कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

फलकानंतर आता कुर्ताच बनला आंदोलनाचे हत्यार

संसद भवनाच्या पायऱ्यांवर कधी हातात फलक, तर कधी अंगावर संदेशात्मक कुर्ता… खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी आंदोलनाची वेगळी शैलीच विकसित केली आहे. प्रत्येक अधिवेशनात जनतेचे प्रश्न थेट संसदेसमोर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. यावेळी सिमेंट रस्ते, NHAI ची कामे आणि E20 पेट्रोलच्या मुद्द्यावर त्यांनी परिधान केलेल्या संदेशात्मक कुर्त्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह संसद परिसरातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले.