नागपूर : रामटेक काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे यांनी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गालावर थट्टामस्करीत हलकीशी चापट मारल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या प्रकारावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.
महामोर्चासाठी खासदारांचा बसमधून प्रवास
दिल्लीतील रामलीला मैदानावर १ नोव्हेंबर रोजी काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनासाठी काँग्रेसचे खासदार एका बसमधून आंदोलनस्थळी जात होते. त्यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर आणि वर्षा गायकवाड या बसमधील एका आसनावर शेजारी बसल्या होत्या. तर रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे त्यांच्या जवळ उभे होते. यावेळी त्यांच्यात काहीसा संवाद आणि थट्टामस्करी सुरू असताना बर्वे यांनी धानोरकर यांच्या उजव्या गालावर हलकीशी चापट मारल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
व्हिडीओ व्हायरल; पक्षांतर्गत तक्रारीची चर्चा
या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. विरोधी पक्षांकडून हा व्हिडीओ व्हायरल करून काँग्रेसला लक्ष्य केले जात असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, काही तथाकथित काँग्रेस कार्यकर्त्यांनी या प्रकाराबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे तक्रार केल्याचे एका वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.
‘थट्टामस्करीत घडलेला प्रकार’; बर्वे यांचे स्पष्टीकरण
या संपूर्ण प्रकरणावर खासदार श्यामकुमार बर्वे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. प्रतिभा धानोरकर या आपल्यासाठी छोट्या बहिणीसारख्या आहेत. आमच्यात नेहमीप्रमाणे थट्टामस्करी सुरू होती. त्याचदरम्यान त्यांच्या गालावर हलकीशी चापट मारली. हा विषय आमच्यापुरताच मर्यादित होता आणि तेथे अन्य खासदारही उपस्थित होते, असे बर्वे यांनी स्पष्ट केले. विरोधक जाणीवपूर्वक काँग्रेसविरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी या व्हिडीओचा वापर करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
प्रतिभा धानोरकर यांचीही समान भूमिका
खासदार प्रतिभा धानोरकर यांनीदेखील या घटनेबाबत बर्वे यांच्याशी मिळतीजुळती भूमिका मांडल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकार थट्टामस्करीतून घडल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित व्हिडीओवरून सुरू झालेल्या चर्चेला दोन्ही खासदारांनी स्पष्टीकरण देत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, व्हिडीओच्या आधारे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असून, काँग्रेस पक्षश्रेष्ठी या प्रकरणाची दखल घेतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले
