महाविकास आघाडी सरकार तुरुंगात टाकणार होते, हे कळायला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता मिळाल्यानंतरही तब्बल सहा महिने का लागले, याचे आश्चर्य आहे. फडणवीसांनी असा कोणतातरी नक्कीच घोटाळा केला असणार, काहीतरी काळेबेरे केले असेल, त्यामुळेच त्यांना जेलमध्ये जाण्याची भीती वाटत होती, असा टोला शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार विनायक राऊत यांनी लगावला. राऊत बुधवारी नागपुरातील महात्मा फुले सभागृहात आयोजित मविआचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
हेही वाचा- ‘वेतन, पेन्शन, पदोन्नतीसह शिक्षणाकडेही लक्ष द्या’; गडकरींनी टोचले शिक्षक संघटनांचे कान
राऊत म्हणाले, सध्या महाराष्ट्रात राजकारणातले लोक पळवण्याची टोळी भाजपच्या माध्यमातून तयार झाली आहे. नाशिकला त्यांनी उमेदवार पळवला. ज्या पक्षाची देशात आणि महाराष्ट्रात सत्ता आहे, त्यांना नाशिकमध्ये उमेदवार मिळू नये ही शोकांतिका आहे. फडणवीसांनी असे कोणतेतरी कारस्थान केले आहे, घोटाळा केला आहे, ज्यामुळे त्यांना जेलमध्ये जाण्याची भीती वाटत आहे. तुरुंगात टाकणार हे त्यांना कळायला इतके दिवस का लागले. नागपुरात अनेक भूखंड घोटाळे झाले आहे. मुख्यमंत्र्यांचे घोटाळे पोटात टाकण्याचे काम केले आहे. देशात आणि राज्यात ईडीचा गैरवापर करण्यात येत आहे. संजय राऊत, अनिल देशमुख यांच्यावर ‘ईडी’ लावली. ‘ईडी’मध्ये आरोपी महिलेकडून पंतप्रधान मोदी यांना राखी बांधून घ्यावी लागते. न्यायमूर्ती लोया यांचा खून झाल्याचा आरोप करणाऱ्या ॲड. सतीश उके यांना थेट ‘ईडी’ अटक करते, म्हणजे आता राज्यातही ‘ईडी’चा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप खा. राऊत यांनी केला.
हेही वाचा- प्राजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात पोलीस ‘अलर्ट मोड’वर, ३ हजार पोलीस बंदोबस्तात
सुधाकर अडबाले हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. या निवडणुकीत सर्वच जागांवर महाविकास आघाडी जिंकणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाला खा. बाळू धानोकरकर, आ. मनीषा कायंदे, डॉ. बबनराव तायवाडे, उमेदवार सुधाकर अडबाले, सलील देशमुख आणि अतुल लोंढे उपस्थित होते.
हेही वाचा- नागपूर: आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून नक्षलग्रस्त हिदूर गावात वैद्यकीय सेवा
गडकरी यांचा अभिमान
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आम्हाला अभिमान आहे. युती कायम काखण्याचे काम गडकरी आणि मुंडे यांनी केले होते. गडकरींनी स्वत:ला सिद्ध केले आहे. अन्यथा केंद्रातील अन्य मंत्री फक्त तोंडाची वाफ गमावत बसला आहे. गडकरींचेसुद्धा पंख छाटण्याचे काम केंद्राने केले. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले नसते तर गडकरीप्रमाणे त्यांनाही राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले असते, असा दावा खा. राऊत यांनी केला.