नागपूर : जिल्ह्यामध्ये सावनेर, हिंगणा, मौदा, पारशिवनी, नागपूर ग्रामीण या पाच तालुक्यात ‘लंपी’ आजाराचा अधिक प्रादुर्भाव असून आतापर्यंत तीन जनावरे मृत्युमुखी पडली तर ३८ जनावरे बाधित झाली आहेत. तथापि, हा आजार लसीकरणानंतर बरा होतो. त्यामुळे शेतकरी, पशुपालकांनी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

राज्य शासनाकडून अतिरिक्त १ लाख प्रतिबंधात्मक लस विमानाने नागपूर जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यात युद्धस्तरावर लसीकरण सुरू आहे. विदर्भात नागपूर जिल्ह्यात या रोगाची वाढती साथ लक्षात घेता. मापसूचे संचालक संशोधक डॉ. अनिल भिकाने यांनी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विस्तार अधिकाऱ्यांना या साथ रोगाबद्दल प्रभावीपणे, नेमका व तातडीचा उपचार करण्यासाठी मार्गदर्शन केले.

हेही वाचा : शेतात काम करणाऱ्या युवकावर गोळी कुणी झाडली ? पोलिसांकडून तपास सुरू

नागपूर जिल्ह्यात नऊ ठिकाणी या आजाराचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी प्रादुर्भाव झाला आहे. त्या ठिकाणी उपचाराचे केंद्र समजून पशुसंवर्धन विभाग कार्यरत झाला आहे. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंजुषा पुंडलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या नऊ ठिकाणी आजाराची तीव्रता अधिक आहे त्या ठिकाणाच्या पाच किलोमीटर परिसरातील सर्व पशूंचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील गौशाळा, रस्त्यावरील मोकाट जनावरे, यांच्यावरही प्रशासन लक्ष ठेवून आहे.