नागपूर : एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या अभ्यासक्रमात मोठा बदल झाला असून, मुख्य परीक्षा २०२५ पासून वर्णनात्मक स्वरूपाची झाली आहे. या नवीन पद्धतीत एकूण ९ पेपर घेण्यात आले असून या बदलाची अंमलबजावणी २०२५ पासून झाली आहे.

मुख्य परीक्षेतील भाषा विषयाचे गुण अंतिम निकालात समाविष्ट न होता ते फक्त पात्रता म्हणून असतील. ९ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षा ३८५ जागांसाठी घेण्यात आली. या परीक्षेसाठी १७५५१६ अर्ज आले आहेत, जे मागील वर्षीच्या तुलनेत कमी असले तरी स्पर्धा वाढल्याचे दर्शवते. मात्र, ९ नोव्हेंबरला झालेल्या परीक्षेच्या हाती आलेल्या माहितीनुसार राज्यभरातील प्रत्येक केंद्रांवर अर्जदारांपैकी केवळ ५० टक्केच उमेदवार उपस्थित असल्याचे चित्र आहे.

अभ्यासक्रमातील बदलाचा हा फटका असल्याचे बोलले जात आहे. उदाहरण म्हणून पहिले असता नागपूर जिल्ह्यातून ८७०० उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी पहिल्या पेपरला केवळ ४९३९ तर दुसऱ्या पेपरल ४८७८ उमेदवार उपस्थित होते. तर छत्रपती संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावर १४ हजार ६९४ अर्जदार विद्यार्थ्यांपैकी केवळ ७ हजार ५४६ विद्यार्थ्यांनी परीक्षेत दांडी मारली.

राज्यातील पूरस्थितीमुळे २८ सप्टेंबर रोजी होणारी ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा २०२५’ पुढे ढकलली होती. परीक्षेच्या काही तास अगोदर आयोगाने याचे परिपत्रक काढले होते. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून वारंवार मागणी केली जात होती पण आयोगाने त्यावर काहीही निर्णय घेतला नव्हता. त्यानंतर राज्य सरकारच्या मध्यस्थिने परीक्षा पुढे ढकलत ती ९ नोव्हेंबरला घेण्यात आली.

या परीक्षेमध्ये राज्यभरातून १ लाख ७५ हजार ५१६ उमेदवारांनी अर्ज केले होते. तर नागपूर जिल्ह्यातून ८७०० उमेदवारांनी अर्ज केले. मात्र, परीक्षेमध्ये ३७६१ उमेदवार अनुपस्थित होते. यंदा परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्यात आला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा आता वर्णनात्मक स्वरूपाची होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे पूर्व परीक्षेला अनेक उमेदवारांची अनुपस्थिती होती असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.