नागपूर: राज्यात ७० हजारांहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी महिन्यात दिली. यातील २० हजार पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र या गोष्टीला पाच महिने उलटून एकही नवीन पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेले नाही. त्यात आता ऑनलाईन परीक्षा रद्द करण्यात आल्याने सरळ सेवा भरतीची शक्यता पुन्हा धूसर झाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतला होता?

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात फेब्रुवारी महिन्यात बैठक झाली. यावेळी फडणवीस यांनी ७० हजार पदांसाठी भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. राज्य प्रशासनातील महत्त्वाच्या विभागांकडे सर्वांगीण प्रशासन सुधारणा वेगाने राबवाव्यात याव्यात, असे सांगत, मुख्यमंत्र्यांनी मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेला प्राधान्य असेल, असे स्पष्ट केले. भरती प्रक्रियेबाबत युवकांच्या मनात शंका राहू नयेत, यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचे आहे. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात ‘गव्हर्नन्स रिफॉर्म’चे नवे मॉडेल उभे राहील. यात प्रत्येक विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी कोणत्याही विभागाने मागे न राहता सर्वांनी एकत्र येऊन प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले होते.

सरकारने काय आदेश दिले होते?

भरती प्रक्रियेत कोणताही संशय, पक्षपात किंवा अन्याय होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी. भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिवांना दिले होते. या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

मेगाभरती का शक्य नाही ?

सरळ सेवा भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या भरतीसाठी दहा लाखाहून अधिक उमेदवार अर्ज करतात. इतक्या उमेदवारांची महाराष्ट्रात एकच वेळी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेणे अशक्यआहे. त्यामुळे आयोगाने ऑनलाईन परीक्षेचा पर्याय निवडला होता. मात्र ऑनलाईन परीक्षेला स्थगिती देण्यात आल्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने असणाऱ्या उमेदवारांची सरळ सेवा भरती घेणे अशक्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तूर्तास एमपीएससी मार्फत सरळ सेवा भरती होण्याची शक्यता धूसर झाली.