नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कृषी सेवा परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास ढासळला आहे. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षपदी राजकीय जवळीक असलेल्या व्यक्तीऐवजी तुकाराम मुंढेंसारख्या सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली.
‘पेपर फुटेल, असे कधी वाटले नव्हते’
रोहित पवार आज नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ‘एमपीएससी’चा पेपर फुटेल, असे कधी वाटले नव्हते. मात्र, पेपरफुटीची घटना घडल्यानंतर विद्यार्थ्यांचा तसेच सर्वसामान्यांचा परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास राहिलेला नाही, असे पवार म्हणाले. आयोगाच्या अध्यक्षपदी एखाद्या राज्यकर्त्याचा मित्र आहे म्हणून त्याची नियुक्ती करण्यापेक्षा तुकाराम मुंढे यांच्यासारख्या चांगल्या आणि सक्षम अधिकाऱ्यांना जबाबदारी दिल्यास परीक्षा यंत्रणेवरील विश्वास पुन्हा निर्माण होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
‘पूर्वीच्या परीक्षांवरही आक्षेप घेतले जातील’
परीक्षा प्रक्रियेवरील विद्यार्थ्यांचा विश्वासच राहिला नसल्याने यापूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षांवरही विद्यार्थी आक्षेप घेतील, अशी शक्यता रोहित पवार यांनी व्यक्त केली. परीक्षा पारदर्शकपणे होत असल्याची खात्री विद्यार्थ्यांना पटवून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी
एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी ही विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील प्रमुख मागणी होती. मात्र, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत या मागणीचा समावेश झाला नसल्याने विद्यार्थी शांत बसणार नाहीत, असा दावा पवार यांनी केला.
‘मदतीला कोणत्याही अटी नकोत’
मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार आणि शेतीमजुरांना कुटुंबामागे २५ हजार रुपयांची मदत जाहीर करण्याची अपेक्षा असल्याचे पवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा शुल्कात सवलत न देता अकादमीच्या शुल्कातही सवलत देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
कर्जमाफी अर्धवट देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रमाणे यावेळी मदत देऊ नये. कोणत्याही अटी न लावता मदत जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली. आतापर्यंत १२ लाख शेतकऱ्यांना १० हजार कोटी रुपये मिळाले असून, आणखी ४३ लाख शेतकऱ्यांचे २५ हजार कोटी रुपये देणे बाकी असल्याचा दावा त्यांनी केला.
‘सरकार संवाद साधण्यात कमी पडतेय’
मनोज जरांगे यांच्या मुंबई दौऱ्याबाबतही पवार यांनी भूमिका मांडली. सरकारकडून ज्या पद्धतीने चर्चा व्हायला हवी होती, तशी चर्चा झाली नाही. कोणीही आंदोलनाला बसले तरी सरकार संवाद साधण्यात कुठेतरी कमी पडत आहे, अशी टीका त्यांनी केली.
जरांगे पाटील हे राजकीय पक्षाचे नसून सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते कोणत्याही राजकीय पक्षाचे ऐकतील असे वाटत नाही. मात्र, मुंबईत सणासुदीचा काळ असल्याने कोणत्याही व्यक्तीला त्रास होऊ नये, अशी अपेक्षा आहे. मागील आंदोलनावेळी हॉटेल, पाणी आणि स्वच्छतागृहांच्या सुविधांचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे सरकार आणि जरांगे पाटील यांनी चर्चेतून याचा विचार करावा, असे आवाहन पवार यांनी केले.
