नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र कृषी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ करीता मुलाखती घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल १७ जून, २०२६ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. त्यानुसार विविध ०३ संवर्गातील एकूण २५८ पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात आल्या आहेत. सदर परीक्षेमधून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेख शाहिद अफसर (बैठक क्रमांक पीएन ००५३१६) हे सर्वसाधारण वर्गवारीतून राज्यात प्रथम आले आहेत. तर पुणे जिल्ह्यातील डुंबरे ऋतुजा रामदास (बैठक क्रमांक पीएन००१०६८) या मागास वर्गवारीतून तथा महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत.

संकेतस्थळावर गुण प्रसिद्ध

उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (सीमांकन गुण) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. प्रस्तुत निकालाधारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठयर्थ नियुक्तीच्यावेळी त्यांची पदासाठीची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून शासनाकडे करण्यात येत आहे. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास तसेच शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.

न्यायालयाच्या निर्णयाचा विचार होणार

प्रस्तुत परीक्षेचा निकाल, समांतर आरक्षणाच्या व अन्य मुद्द्यांसंदर्भात विविध न्यायालयात / न्यायाधिकरणात तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, नागपूर येथे दाखल मूळ अर्ज क्र. ३१८/२०२६, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, छ. संभाजी नगर येथे दाखल मूळ अर्ज क्र. ९४/२०२६ आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्र. २९३/२०२६ आणि ३०२/२०२६ आणि उच्च न्यायालय, औरंगाबाद येथे दाखल रिट याचिका क्र. १४७१/२०२६ या प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे. सदर शिफारस यादीनुसार आरक्षित पदांवर उमेदवारांची शिफारस / निवड विहित प्राधिकरणांकडून सखोल तपासणी करण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहे.

उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करा

प्रस्तुत अंतिम निकालाच्या आधारे शिफारस पात्र ठरलेल्या / ना शिफारसपात्र ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. या संदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचनांचे अवलोकन संबंधितांनी करणे आवश्यक आहे. एमपीएससीतर्फे १८ मे रोजी कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२५ घेण्यात आली होती. राज्यसेवा, वनसेवा आणि स्थापत्य अभियांत्रिकी सेवांच्या मुख्य परीक्षांचे निकाल जाहीर होऊन मुलाखतीदेखील पूर्ण होऊन तात्पुरता निवड याद्याही प्रसिद्ध झाल्या. मात्र, कृषी सेवेची परीक्षेनंतर सहा महिने निकाल जाहीर होत नसल्याने राज्यभरातील उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. अखेर, एमपीएससीकडून मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला