नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब) २०२५ च्या जाहिरातीमध्ये एकूण ६७४ पदे जाहीर झाली असून त्यात पोलीस उपनिरीक्षकांसाठी (पीएसआय) ३९२ पदांचा समावेश आहे. या परीक्षेदरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना एकवेळची विशेष संधी देण्याची मागणी परीक्षार्थ्यांनी केली आहे. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पत्रानंतर आता आयोगाच्या अध्यक्षांकडे बैठकीसाठी वेळ मागण्यात आली असून वयाच्या सवलतीबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.
सामान्यतः ही जाहिरात डिसेंबर-जानेवारीत येते. त्यानंतर परीक्षा मार्च-मे महिन्यात होते. यावर्षी मात्र जाहिरात २९ जुलै २०२५ रोजी निघून परीक्षा ४ जानेवारीला होणार आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे वयोमर्यादा मोजण्यासाठी १ नोव्हेंबर २०२५ ही तारीख निश्चित केली आहे. यामुळे गेल्या ३-४ वर्षांपासून तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वय १-२ महिन्यांनी अधिक झाले असून ते आपोआप अपात्र ठरत आहेत. पोलीस भरतीमध्ये २०२२-२५ दरम्यान वय ओलांडलेल्या उमेदवारांना राज्य शासनाने एकवेळची विशेष संधी दिली होती. त्या धर्तीवर आता एमपीएससी संयुक्त गट-ब (विशेषतः पीएसआय) साठीही अशा विद्यार्थ्यांना एकवेळची वयोमर्यादा सवलत देण्याचा निर्णय तत्काळ घ्यावा, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध लोकप्रतिनिधींकडूनही पाठवण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनीही ट्विटरच्या माध्यमातून, यावर चिंता व्यक्त केली आहे. यानंतर चाकरणकर यांनीही आयोगाशी पत्रव्यवहार करून बैठकीची वेळ मागीतली आहेत. तसेच सामान्य प्रशासन विभागाला पत्र पाठवले आहे. त्यामुळे वयोमर्यादेत सवलत मिळण्याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चाकणकर यांची मागणी काय ?
राज्यभरातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध समाज माध्यमांतून ‘अराजपत्रीत संयुक्त पूर्व परीक्षा २०२५’ परीक्षेसाठी १ वर्ष वय सवलत देण्यात यावी अशी मागणी माझ्याकडे केली आहे. संयुक्त परीक्षा २०२५ ची जाहिरात ही ७ महिने उशिराने प्रसिद्ध झाल्याने असंख्य विद्यार्थी वयाच्या मर्यादेमुळे वंचित राहत असून त्यांचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा. शासनाने २०२४ च्या परीक्षेसाठी १ वर्षाची वय सवलत दिली तसेच नुकत्याच झालेल्या पोलीस भरती सुद्धा १ वर्षाची सवलत दिली त्याच धर्तीवर या स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलत देण्यात यावी, अशी मागणी रूपाली चाकणकर यांनी केली आहे.
