नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राज्यभर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. पेपरफुटीसंदर्भात आयोगाचे अध्यक्षांचा राजीनामा, इतर अधिकाऱ्यांची न्यायालयीन चौकशी, रिक्त पदांची भरती अशा काही मागण्यांसंदर्भात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार हे मुख्यमंत्र्यांचे मित्र असल्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. आता अध्यक्षांच्या जुन्या काही सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या सोशल मीडिया खात्यावरून या पोस्ट व्हायरल करण्यात आले असून यामध्ये भिमनगर फडणवीसांची कशी स्तुती करतात हे दिसून येत आहे.
भिमनगर यांच्या संदर्भात फडणवीस काय म्हणाले होते
“एमपीएससी अध्यक्षांना हटवणे किंवा त्यांचा राजीनामा घेणे, हे राज्य सरकारच्या हातात नाही. राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनंतरच त्यांना हटवता येते. हे संविधानात नमूद केलेले आहे. याची सर्वांना जाणीव आहे”, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली होती. “ज्याकाळात पेपर फुटला तेव्हा विद्यमान अध्यक्ष पदावर नव्हते. पेपरफुटीनंतर पदावर आलेल्या अध्यक्षांना काढण्यासाठी राष्ट्रपतींना सांगा, अशी मागणी करणे कितपत योग्य आहे, याचाही विचार व्हायला हवा. तरीही राज्य सरकारने पुढे येऊन सांगितले की, विद्यार्थ्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी विद्यमान अध्यक्षांसह माजी अध्यक्षांची चौकशी करण्यासाठी तयार आहोत. त्या चौकशीमध्ये अनुच्छेद ३१७ प्रमाणे काहीही गैरकारभार झाल्याचे समोर आले तर राष्ट्रपतींना शिफारस करायला आम्ही मागे-पुढे पाहणार नाही. या संदर्भात राज्य सरकारने राज्यपालांनाही विनंती केली आहे.”

भीमनवार फडणवीसांचे कार्यकर्ते
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०१४ मध्ये जेव्हा पहिल्यांदा निवडणूक जिंकून मुख्यमंत्री झाले त्यावेळी एमपीएससीचे अध्यक्ष भिमनगर यांनी एक पोस्ट केलेली आहे. या पोस्टमध्ये “केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र” असा उल्लेख करण्यात आलेला आहे. यावरून भिमनगर हे फडणवीसांचे सोशल मीडिया कार्यकर्ते आहेत, असा आरोप इंडियन काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया खात्यावरून करण्यात आलेला आहे. हा भिमनवार यांच्या विरोधातील मोठा पुरावा असून ते फडणवीसांचे कसे निकटवर्ती आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न या सोशल मीडिया खात्याच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
