नागपूर : एमपीएससीच्या अध्यक्षपदावर विवेक भिमनवार असताना परीक्षा प्रक्रियेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांच्या कारकीर्दीची चौकशी करून विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.
‘भिमनवार यांच्या कारकीर्दीची चौकशी करा’
आरटीओ आयुक्त असताना विवेक भिमनवार यांनी घेतलेल्या निर्णयांची आणि त्यांच्या काळात देण्यात आलेल्या विविध कंत्राटांची अधिकृत माहिती पुराव्यासह मागविणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. भिमनवार यांच्याविरोधात १ सप्टेंबर २०२६ रोजी अनेकांनी पत्रे दिल्याचा दावा करत, त्यांच्यावर हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची चर्चा होत असेल तर त्याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी. एमपीएससीला चांगला अधिकारी द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
‘अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी’
एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेवरूनही पवार यांनी आयोगाला लक्ष्य केले. १९९७ मध्ये पहिल्यांदा एमपीएससीचा पेपर फुटल्याचा संदर्भ देत, सध्याच्या अध्यक्षांच्या कार्यकाळात पेपरफुटीचा आरोप होत असेल तर ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले. अध्यक्ष असताना पेपर फुटला असेल तर नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
एमपीएससीमधील कारभाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा. लोकांचा आयोगावरील विश्वास वाढविण्यासाठी सक्षम आणि स्वच्छ प्रतिमेचा अध्यक्ष नेमावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. गरज असल्यास तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे उदाहरणही त्यांनी दिले.
‘तीन दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन’
एमपीएससीच्या विविध परीक्षांबाबत पुराव्यांसह आक्षेप नोंदविले असल्याचा दावा पवार यांनी केला. गट-ब, पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) आणि कृषी विभागाच्या परीक्षांमध्येही प्रश्न उपस्थित झाल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तीन दिवसांत सकारात्मक उत्तर मिळाले नाही तर पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलन केले जाईल. पुण्यात ५० हजार विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा इशारा त्यांनी दिला.
‘मार्किंग पॅटर्नची माहिती फुटल्यास गंभीर परिणाम’
एक्साईजअंतर्गत झालेल्या परीक्षेच्या मार्किंग पॅटर्नवरही पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. मार्किंग पॅटर्न समजला आणि त्यानुसार अभ्यास केला तर कमी वेळेत अधिक गुण मिळविता येतात. ही माहिती एमपीएससीमधून बाहेर गेली असेल तर हा गंभीर प्रकार आहे, असा आरोप त्यांनी केला.
पीएसआय परीक्षेतून नाव कमी करून प्रशिक्षणासाठी पाठविणे, पैसे देऊन अधिकारी होणे आणि त्यानंतर जनतेची सेवा करण्याऐवजी भ्रष्टाचाराला खतपाणी मिळणे, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. एमपीएससीकडून परीक्षा पद्धतीबाबतचे आरोप नाकारले जात असतील तर त्याबाबत स्पष्टता देण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले. अध्यक्ष चहा-बिस्कीट खाण्यासाठी झाले आहेत का? आधी नाकारायचे आणि नंतर स्वीकारायचे, हे योग्य नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
