नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या कार्यकाळातील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने राज्यपालांकडे शिफारस केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा न करता भीमनवार यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
‘चौकशीला वेळ लागेल, विद्यार्थ्यांचा विश्वास कसा टिकणार?’
एमपीएससी अध्यक्षांच्या कार्यकाळातील गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी सरकारने राज्यपालांकडे शिफारस केली आहे. आता चौकशी होईल आणि त्यासाठी पुन्हा वेळ जाईल. त्यामुळे वेळकाढूपणा न करता अध्यक्षांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. विद्यार्थी अनेक दिवसांपासून रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या आंदोलनाकडे राजकीय आकसातून न पाहता त्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
दुष्काळावरून सरकारवर टीका
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरूनही वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. कोरोनापेक्षाही दुष्काळाची परिस्थिती गंभीर असल्याचे सरकारमधील मंत्री सांगत आहेत. मग परिस्थिती इतकी गंभीर होईपर्यंत सरकारने काय केले, असा सवाल त्यांनी केला. अल निनोमुळे पावसावर परिणाम होऊन पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता सरकारला आधीपासून माहिती होती. तरीही पाणी, चारा आणि शेतीच्या प्रश्नांवर वेळेत उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘तहान लागली की विहीर खोदायची’, ही सरकारची कार्यपद्धती असल्याची टीकाही त्यांनी केली.
जलसंधारणाच्या ३८ हजार कोटींच्या खर्चाची चौकशी करा
जलसंधारणावर तब्बल ३८ हजार कोटी रुपये खर्च करूनही महाराष्ट्र दुष्काळाच्या संकटात का सापडला, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र, आजही राज्यातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जलसंधारणासाठी झालेल्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही सवाल
इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाविरोधात काढलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही टीका केली. एसआयआर आणि फॉर्म सहा संदर्भातील निर्णयांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, मतदार यादी आणि मतदान प्रक्रियेत पारदर्शकता व निष्पक्षता असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
