देवेश गोंडाणे

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.  याची अंमलबजावणी  २०२३ पासून केली जाणार आहे. परंतु अनेक वर्षांपासून परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि वयोमर्यादा ओलांडण्याच्या काठावर असणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा बदल अन्यायकारक ठरणार आहे. त्यामुळे नवीन सुधारणा किमान दोन ते तीन वर्षांनंतर लागू कराव्या, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्यसेवा मुख्य लेखी परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत २०२३ पासून लागू केली जाणार आहे.  स्पर्धा परीक्षार्थी हे किमान चार ते पाच वर्षे ‘एमपीएससी’चा अभ्यास करतात. याआधी मुख्य परीक्षा ही बहुपर्यायी पद्धतीने होत असल्याने विद्यार्थ्यांनी त्याच पद्धतीने अभ्यास केला आहे. आता आयोगाने नव्याने केलेला बदल चांगला असला  तरी तो पुढील वर्षांपासून लागू होणार असल्याने चार ते पाच वर्षे केलेल्या अभ्यासाचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अनेक विद्यार्थी हे वयोमर्यादा ओलांडण्याच्या काठावर आहेत. त्यांच्याकडे परीक्षेच्या केवळ एक ते दोनच संधी आहेत. या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान या निर्णयामुळे होणार आहे. त्यामुळे आयोगाने नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी किमान दोन ते तीन वर्षांनी लागू करावी, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात काही विद्यार्थी संघटनांनी आयोगाला निवेदनही पाठवले आहे.

‘२०२५ पासून अंमलबजावणी करा’

जे विद्यार्थी मागील तीन ते चार वर्षांपासून एमपीएससीचा अभ्यास करीत आहेत त्यांना यूपीएससीच्या परीक्षार्थीशी स्पर्धा करावी लागणार आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेचा सराव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. लेखी परीक्षेची तयारी करायला किमान दोन वर्षे वेळ लागतो. त्यामुळे बदलाबाबत निर्णयाची अंमलबजावणी २०२५ पासून करण्याची विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.