नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) संयुक्त गट-ब (अराजपत्रित) परीक्षा २०२५ संदर्भात पेपरफुटीच्या आरोपांची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (SIT) सुरू असल्याची चर्चा असताना, या चौकशीचा फटका प्रामाणिकपणे निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बसत असल्याची भावना उमेदवारांकडून व्यक्त होत आहे. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी; मात्र संपूर्ण परीक्षा सरसकट रद्द करून प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय करू नये, अशी मागणी निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

संयुक्त गट-ब (अराजपत्रित) परीक्षा २०२५ ची जाहिरात २९ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झाली होती. पूर्व परीक्षा सुरुवातीला ९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार होती. मात्र ही परीक्षा दोन वेळा पुढे ढकलल्यानंतर अखेर ४ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आली. पूर्व परीक्षेचा निकाल २३ मार्च २०२६ रोजी जाहीर झाला. त्यानंतर १७ मे २०२६ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली आणि १४ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या भरती प्रक्रियेत एकूण ७५८ पदे उपलब्ध होती. त्यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी तीन, राज्यकर निरीक्षक २७९, पोलीस उपनिरीक्षक ३९२ आणि दुय्यम निबंधक ८४ पदांचा समावेश होता.

कागदपत्र पडताळणी स्थगित

मुख्य परीक्षेतून दुय्यम निबंधक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी २२ आणि २३ सप्टेंबर रोजी नियोजित करण्यात आली होती. मात्र ही प्रक्रिया अनिश्चित कारणास्तव स्थगित करण्यात आली. SIT चौकशीचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती माध्यमांतून समोर आल्याने निवड झालेल्या उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रक्रियेत निवड झालेले अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील तसेच आर्थिकदृष्ट्या सामान्य पार्श्वभूमीचे आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी दोन ते तीन वर्षे सातत्याने अभ्यास करून ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे नियुक्ती प्रक्रियेतील अनिश्चिततेचा त्यांच्या मानसिक आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

चौकशीला आमचा विरोध नाही

निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून SIT चौकशीला विरोध करण्यात आलेला नाही. उलट, परीक्षेत कोणताही गैरप्रकार झाला असल्यास त्याची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशीच त्यांची भूमिका आहे. मात्र चौकशीचा अंतिम अहवाल येण्यापूर्वीच संपूर्ण परीक्षा गैरप्रकारग्रस्त असल्याचा निष्कर्ष काढणे आणि परीक्षा रद्द करण्याची मागणी करणे, हे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्यायकारक ठरू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.

‘चौकशीत दोषी आढळणाऱ्या उमेदवारांवर कारवाई करावी; मात्र दोषींमुळे संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करू नये,’ अशी मागणी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

संशय आणि पुरावा यातील फरक महत्त्वाचा

सध्या काही टेलिग्राम समूह आणि व्यक्तींकडून संयुक्त गट-ब परीक्षा २०२५ संदर्भात पेपरफुटी झाल्याचे दावे केले जात असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. या दाव्यांबाबत SITचा अंतिम अहवाल अद्याप समोर आलेला नसताना परीक्षेचा पेपर ‘निश्चितपणे फुटला होता’, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली आहे.

ड्रग इन्स्पेक्टर पेपरफुटी प्रकरणातील आरोपींचा संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा २०२५शी संबंध जोडला जात असल्याचा दावाही काही ठिकाणी केला जात आहे. संबंधित आरोपींनी यापूर्वी विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्या असल्याचा उल्लेखही केला जात आहे. तसेच काही प्रश्नपत्रिकांमध्ये समान गुण मिळणे किंवा गुणांमध्ये साम्य आढळणे, हे एकट्याने गैरप्रकार सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे का, हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
याबाबत अंतिम निष्कर्ष तपास यंत्रणेच्या चौकशीनंतरच निघणे अपेक्षित आहे. त्यामुळे तपास पूर्ण होण्यापूर्वी सोशल मीडियावरील दावे हे अंतिम सत्य मानणे टाळावे, अशी अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त होत आहे.

परीक्षा पुन्हा झाली तर संधी मिळेल या अपेक्षेचा परिणाम

संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा दरवर्षी लाखो विद्यार्थी देतात. यंदाही सुमारे तीन ते चार लाख विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा दिली, तर त्यापैकी सुमारे १३ हजार विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले. अखेरीस ७५८ पदांसाठी निवड प्रक्रिया झाली.

परीक्षेत निवड न झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा परीक्षा घेतल्यास नव्याने संधी मिळेल, अशी भावना असणे स्वाभाविक आहे. मात्र दुसरीकडे, आधीच गुणवत्ता सिद्ध करून अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय मोठा धक्का ठरू शकतो. ‘एकदा यश मिळाले असले तरी पुन्हा त्याच पातळीवर यश मिळेलच, याची शाश्वती नाही,’ अशी भावना निवड झालेल्या उमेदवारांकडून व्यक्त होत आहे.

SITच्या चौकशीचा कालबद्ध अहवाल आवश्यक

निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी म्हणजे SIT चौकशी पारदर्शक आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात यावी. चौकशीसाठी अधिक वेळ लागणार असल्यास आणि कायदेशीरदृष्ट्या शक्य असल्यास, संशयित उमेदवारांना वगळून इतर पात्र व निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत शासनाने कायद्याच्या चौकटीत निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

जाहिरात प्रसिद्ध होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटत आला असताना भरती प्रक्रियेतील अनिश्चितता आणखी वाढू नये, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

अफवांवर कारवाईची मागणी

तपास पूर्ण होण्यापूर्वी परीक्षेबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्यास अशा प्रकारांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सोशल मीडिया किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून खोटी माहिती पसरवली जात असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

SITचा अंतिम अहवाल काय सांगतो, यावरच या प्रकरणातील पुढील दिशा निश्चित होणार आहे. त्यामुळे चौकशीपूर्वीच परीक्षा रद्द करण्याचा निष्कर्ष काढण्याऐवजी दोषी आणि निर्दोष यांच्यात स्पष्ट भेद करून निर्णय घेणे, तसेच प्रामाणिकपणे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे हित जपणे, हे प्रशासनासमोरील महत्त्वाचे आव्हान ठरणार आहे.