नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क परीक्षा घेतली. त्याच्या गुणांकनासंदर्भातील गोपनीय दस्तऐवज उघड झाले. त्यानंतर तक्रारीच्या चौकशीत धक्कादायक बाब समोर आली आहे. चौकशी अहवालात चुकीची व दिशाभूल करणारी माहिती नमूद केल्याचा ठपका ठेवत पोलिस निरीक्षक राहुल शिरे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण….?
अर्जदार रवींद्र दिनकर इंगोले व इतर उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क’ परीक्षेतील गुणांकनाबाबतचे गोपनीय दस्तऐवज उघड झाल्याची तक्रार ३ जानेवारी २०२६ रोजी नागपूर गुन्हे शाखेच्या पोलीस उपआयुक्तांकडे केली होती. या अर्जाच्या चौकशीची जबाबदारी तत्कालीन पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
अहवालातील तफावत आणि चुकीची माहिती: पोलीस निरीक्षक शिरे यांनी ३ एप्रिल २०२६ रोजी तक्रार अर्ज फाईल (बंद) करण्याबाबत अहवाल सादर केला. या प्रकरणात नवी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी चौकशी केली असून, त्यांनी फोनवर दिलेल्या माहितीनुसार अहवालात ‘सहसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर’ दोषी असल्याचे नमूद केले होते.
ध्वनिफितीच्या पडताळणीतून सत्य उघड: सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) यांनी केलेल्या चौकशीदरम्यान शिरे आणि पाटील यांच्यातील दूरध्वनी संभाषणाची ध्वनिफित सादर करण्यात आली. चौकशी अधिकाऱ्यांनी या ध्वनिफितीची पडताळणी केली असता, त्यात MPSC च्या सहसचिवांचा कोणताही उल्लेख आढळला नाही.
त्यामुळे पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांनी अहवालात दिलेली माहिती चुकीची, खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारचे बेकायदेशीर वर्तन आणि खोटी माहिती नमूद करण्यामागील हेतू स्पष्ट करण्यासाठी आणि शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्यांची विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
