नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) पुन्हा एक नवीन गोंधळ समोर आला आहे. यामुळे आयोगावरील असलेला विश्वास पुन्हा ढासळला आहे. आयोगाने एका परीक्षेचा निकाल अद्यापही जाहीर केलेला नाही. असे असतानाही मुलाखत कार्यक्रम जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे या सर्व मुलाखती पाच दिवसांवर आलेल्या आहेत. सर्व मुलाखती मुंबईला होणार आहेत. परंतु, कुठल्या उमेदवाराची मुलाखतीसाठी निवड झाली हेच माहिती नसल्याने प्रचंड अडचण निर्माण झाली आहे.

नेमके काय प्रकरण आहे?

एमपीएससीच्यावतीने माहिती व जनसंपर्क महासंचालयातील वरिष्ठ सहायक संचालक, वरिष्ठ उपसंपादक पदासाठी मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून १६ आणि १७ जूनला मुलाखती होणार आहेत. मुलाखती अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, तरीही अद्याप या पदाच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. या परिस्थितीत उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. ‘एमपीएससी’च्या विविध परीक्षा आणि निकालाला गती आली आहे. असे असले तरी अनेक परीक्षांमधील गोंधळ अद्यापही कायम असल्याने उमेदवारांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

उमेदवारांची काय अडचण होणार?

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एमपीएससीने माहिती व जनसंपर्क संचालयालयाच्या विविध पदांसाठी मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केला. यातील काही पदांच्या मुलाखतीही झाल्या. मात्र, जाहिरात क्रमांक १३० मधील वरिष्ठ सहायक संचालक, वरिष्ठ उपसंपादक, जनसंपर्क अधिकारी गट अ या पदांसाठी मुलाखती कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यानुसार १६ आणि १७ जूनला उमदेवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. अपात्र उमदेवारांची यादी आयोगाने जाहीर केली आहे. मात्र, पात्र उमेदवारांची यादी अद्यापही जाहीर झालेली नाही. तसेच मुलाखतीसाठी कुठल्याही उमेदवारांना ई-मेल किंवा संदेशही पाठवण्यात आलेला नाही. त्यामुळे उमेदवारांची चिंता वाढली आहे. पाच दिवसांवर मुलाखती आल्या आहेत. तसेच सर्व मुलाखती या मुंबईला होणार असल्याने उमेदवारांना रेल्वेचे आरक्षण करण्यासह अनेक गोष्टींची तयारी करावी लागते. वेळेवर यादी जाहीर झाल्यास उमदेवारांची तारांबळ उडणार आहे. त्यामुळे आयोगाने तात्काळ मुलाखतीसाठी पात्र उमदेवारांची यादी जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

उमेदवारांची मागणी काय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात क्र. १३०/२०२२ अंतर्गत ‘वरिष्ठ सहायक संचालक/जिल्हा माहिती अधिकारी/जनसंपर्क अधिकारी’ या पदांच्या मुलाखती १६ आणि १७ जून रोजी आयोजित केल्याचे जाहीर केले आहे. आज १० जून २०२६ आहे. मुलाखती अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, तरीही अद्याप या पदाच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. ​या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. निकालच माहीत नसल्यामुळे ऐन वेळी मुलाखतीची तयारी कशी करावी आणि मुंबईला पोहोचण्यासाठी रेल्वेचे आरक्षण वेळेवर कसे मिळवावे, अशा अनेक विवंचनेत सध्या सर्व उमेदवार आहेत. कृपया या प्रश्नाची गांभीर्याने दखल घ्यावी.