नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप मैदानी चाचणी झालेली नाही. २०१ उमेदवारांनी केलेल्या गैरप्रकाराचा भुर्दंड आता शारीरिक चाचणीच्या प्रतीक्षेत असलेल्या २२८६ प्रामाणिक उमेदवारांना सोसावा लागत आहे.
काय गैरप्रकार झाला?
पोलीस उपनिरीक्षक विभागीय स्पर्धा परीक्षेनुसार ६१५ जागांसाठी १० डिसेंबर २०२३ रोजी राज्यभरातील २७ हजारांहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी पूर्व परीक्षा दिली होती. त्यातून जवळपास ७४०० उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले. २९ डिसेंबर २०२४ रोजी मुख्य परीक्षा झाल्यानंतर मार्च किंवा एप्रिल २०२५ पर्यंत शारीरिक चाचणी होणे अपेक्षित होते.
यादरम्यान, २०१ उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले. आयोगाने त्यांना ३ वर्षांसाठी अपात्र ठरवले, मात्र हे उमेदवार न्यायालयात गेले. न्यायालयाने १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सुनावणी देताना ‘नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार’ संबंधितांना आपली बाजू मांडण्याची संधी देऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले. तेव्हापासून आयोगाने ही प्रक्रिया प्रलंबित ठेवली आहे.
पोलिसांची अडचण काय?
पात्र सर्व उमेदवार सध्या पोलीस दलात कार्यरत आहेत. रोजचे कर्तव्य सांभाळून ते मैदानी चाचणीसाठी मैदानावर घाम गाळत आहेत.
चाचणीत अपात्र ठरू नये म्हणून अनेकजण शहरात राहून खाजगी प्रशिक्षक नेमून व पौष्टिक आहार घेऊन १० ते १२ हजार रुपये खर्च करत आहेत. मात्र, वेळेत मैदानी चाचणी होत नसल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
शिस्तप्रिय खात्यात असल्याने त्यांना उघडपणे आपली बाजूही मांडता येत नाही. ऑक्टोबर २०२५ मध्ये मुंबईत होणारी चाचणी अतिवृष्टीमुळे नोव्हेंबरमध्ये नियोजित होती. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे १६ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोगाने ‘प्रशासकीय कारण’ देऊन ही चाचणी स्थगित केली. लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर होईल असे सांगण्यात आले होते, मात्र अद्याप तारखांची घोषणा झालेली नाही. २०२३ पासून सुरू असलेली ही भरती प्रक्रिया २०२६ मध्ये तरी पूर्ण होईल का, अशी चिंता उमेदवारांतून व्यक्त होत आहे.
उमेदवारांचे म्हणणे काय?
त्यामुळे एकतर आयोगाने आपली कायदेशीर प्रक्रिया लवकर संपवावी किवा न्यायालयाच्या निर्णयास अधिन राहून २२८६ उमेदवारांची मैदानी चाचणी लवकरात लवकर घ्यावी अशी मागणी उमेदवारांमधून होत आहे. नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर लोकसेवा आयोगाच्या उपसंचालकांनी लोकसत्ताशी साधलेल्या संवादात लांबलेल्या शारीरिक चाचणीला दुजोरा दिला.
न्यायप्राधिकरणाच्या आदेशानंतर अपात्र ठरवलेल्या उमेदवारांची बाजू जाणून घेतली जात आहे. ही प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. लवकरच शारीरिक चाचणीचे वेळापत्रक प्रसिद्ध होईल. उमेदवारांना १५ ते २० दिवसांची मुदतही दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
