नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी असतात. परंतु, अनेकदा या तक्रारी सोडवल्या जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. काही परीक्षांचे केंद्र हे मुंबईला ठेवण्यात आल्यानेही विद्यार्थी हवालदिल होतात. त्यामुळे याला अनेक वर्षांपासून विरोध होता. गडचिरोलीच्या विद्यार्थ्यालाही मुंबई गाठावी लागत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. विविध परीक्षांसाठी मुंबईला जाण्याऐवजी परीक्षा केंद्र विभागीय कार्यालय असलेल्या शहरांमध्ये देण्याची मागणी करण्यात आली होती. याची दखल आता एमपीएससीने घेतली आहे. तसेच यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केल्याने अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

या शहरांमध्ये होणार परीक्षा

विविध प्राध्यापक संवर्गाच्या चाळणी परीक्षा सुरुवातीला केवळ मुंबई येथे आयोजित करण्यात आल्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील हजारो परीक्षार्थ्यांची होणारी गैरसोय अखेर दूर झाली आहे. मुंबईसह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि पुणे येथे परीक्षा केंद्रे उपलब्ध करून देण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काय अडचण होती?

प्राध्यापक संवर्गातील सुमारे ४२ विषयांच्या चाळणी परीक्षा विविध जाहिरातींतर्गत जाहीर करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला या परीक्षा मुंबईतच घेण्यात येणार असल्याने भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरसह विदर्भातील तसेच मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना केवळ एक तासाच्या परीक्षेसाठी मुंबईचा लांबचा आणि खर्चिक प्रवास करावा लागणार होता. पावसाळ्यातील प्रवासाची अडचणही विद्यार्थ्यांसमोर होती. या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीच्या वतीने ६ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन विदर्भासाठी नागपूर आणि मराठवाड्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी या मागणीसाठी पाठपुरावा केला. या मागणीची दखल घेत एमपीएससीने आता मुंबईसह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि पुणे या पाच शहरांत परीक्षा केंद्रे उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे प्रवासाचा वेळ, खर्च आणि पावसाळ्यातील गैरसोय कमी होणार असल्याने विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.