नागपूर : एमपीएससी परीक्षेतील गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर सरकारवर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. विरोधक विद्यार्थ्यांच्या मोर्चात सहभागी होत आहे. विद्यार्थ्यांना एकप्रकारे प्रोत्साहित केले जात आहे. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपुरात प्रसारमाध्यमासोबत बोलताना विरोधकांवर टीका केली.
परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही
मारबत महोत्सवासाठी मुख्यमंत्री नागपुरात आले असता प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. ते म्हणाले, एमपीएससी परीक्षेतील गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने गुरुवारी सविस्तर बैठक घेऊन सर्व बाबींवर सकारात्मक चर्चा केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर आहे. परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांना जेरबंद केले आहे. भविष्यातही अशा प्रकारांना पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. परंतु काहीजण विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे समाधान करण्याऐवजी या मुद्द्याचे राजकारण करून त्यातून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मात्र, कोणालाही विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राजकीय फायदा घेता येणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. राज्य सरकार पूर्ण ताकदीने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहे, असेही त्यांनी सांगितले. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून, भविष्यात अधिक पारदर्शक परीक्षा पद्धती लागू केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
जरांगे पाटील यांना आवाहन
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावरून मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या प्रत्येकाने हिंदूंच्या सणांचा आणि गणेशोत्सवाचा आदर करावा. हिंदूंच्या सणांमध्ये किंवा गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारचे विघ्न आणले जाऊ नये, असे आवाहन त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना केले.
दीपकेंनी दिला होता इशारा
एमपीएससीची तयारी करणाऱ्या पुण्यातील प्रथमेश देशमुख या तरुणाने जीवन संपवल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. विद्यार्थ्यांच्या टोकाच्या निर्णयाने पुन्हा एकदा मोठी समस्या निर्माण झाली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी १० सप्टेंबरला धाराशिवमध्ये आत्महत्या करणाऱ्या प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी या प्रश्नावर आता महाराष्ट्रात आंदोलन छेडण्याचा निर्णय जाहीर केला.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मी स्वतः महाराष्ट्रात मैदानात उतरणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. प्रथमेश समोर आर्थिक अडचणी होत्या. त्याच्यावर कर्जही होते. त्यामुळे तो खचला होता. पुण्यात राहताना तो एकवेळ जेवण करून दिवस काढत होता. त्यातच प्रथमेशची शेती वाहून गेली. दुष्काळ पडल्याने तो खचून गेला होता. त्या नैराश्यातूनच त्याने टोकाचं पाऊल उचलले, असे सांगतानाच कितीही संकट आले तरी खचून जाऊ नका. हार मानू नका, असे आवाहन दीपके यांनी विद्यार्थ्यांना केले होेते.
