नागपूर : आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गाच्या तुलनेत कमी गुणांवर संधी मिळते, अशी चर्चा आरक्षणाच्या संदर्भात सातत्याने केली जाते. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) २०२४ आणि २०२५ मधील काही निवडक परीक्षांच्या उपलब्ध कट-ऑफ (गुणांची सीमारेषा) आकडेवारीवर नजर टाकल्यास चित्र काहीसे वेगळे दिसते. अनेक परीक्षांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गाच्या तुलनेत इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गाचा कट-ऑफ अधिक असल्याचे दिसून येते. काही परीक्षांमध्ये अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गाचाही कट-ऑफ ‘ईडब्ल्यूएस’पेक्षा अधिक आहे.

खुला प्रवर्ग हा केवळ विशिष्ट जाती किंवा सामाजिक प्रवर्गासाठी राखीव नसून, पात्रता पूर्ण करणार्‍या सर्व उमेदवारांसाठी खुला असतो. त्यामुळे खुल्या प्रवर्गाच्या कट-ऑफची राखीव प्रवर्गाशी थेट तुलना करणे योग्य ठरत नाही. मात्र, २०१९ मध्ये १०३ व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद झाल्यानंतर नोकरभरतीत ‘ईडब्ल्यूएस’ हा स्वतंत्र आरक्षित प्रवर्ग ठरला.

त्यामुळे ‘ईडब्ल्यूएस’ आणि इतर आरक्षित प्रवर्गांच्या कट-ऑफची तुलनात्मक आकडेवारी पाहता येते. २०२५च्या राज्यसेवा अंतिम निकालात पुरुष उमेदवारांसाठी ‘ईडब्ल्यूएस’चा कट-ऑफ २८१.५०, तर ओबीसीचा २९५.५० होता. म्हणजेच ओबीसीचा कट-ऑफ ‘ईडब्ल्यूएस’पेक्षा १४ गुणांनी अधिक होता. त्याच निकालात एससीचा कट-ऑफ २७३ गुण होता. राज्य कर निरीक्षकपदाच्या २०२५च्या अंतिम निकालातही ‘ईडब्ल्यूएस’पेक्षा ओबीसीचा कट-ऑफ अधिक होता.

आरक्षित प्रवर्ग म्हणजे कमी कट-ऑफ असे सरसकट समीकरण या निवडक आकडेवारीवरून मांडता येणार नाही. कट-ऑफ हा संबंधित वर्षातील पदांची संख्या, उमेदवारांची संख्या, परीक्षेची काठिण्यपातळी, प्रवर्गनिहाय स्पर्धा, महिला व समांतर आरक्षण, पात्रता आणि निवड प्रक्रियेतील अन्य घटकांवर अवलंबून असतो. – डॉ. संजय देशपांडे,  सेव्ह मेरीट, सेव्ह नेशन संघटना