अमरावती: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध चाळणी परीक्षांसाठी दिव्यांग उमेदवारांना सहायक (लेखनिक) आणि भरपाई वेळ मिळवण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या सवलती मिळवण्यासाठी उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांसह येत्या १७ एप्रिल २०२६ पर्यंत आयोगाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. आयोगाने २७ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या सहायक प्राध्यापक (स्थापत्य अभियांत्रिकी), नगररचनाकार आणि दंत महाविद्यालयीन विविध पदांच्या सामायिक चाळणी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या आहेत.
ई-मेलद्वारे अर्ज करणे बंधनकारक
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील व्याख्येनुसार लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या उमेदवारांना लेखनिकाची सुविधा देण्यात येते. दिव्यांग उमेदवारांनी सहायक आणि भरपाई वेळेसाठीचे विनंती अर्ज केवळ so-vpr@mpsc.gov.in या अधिकृत ई-मेल आयडीवरच पाठवायचे आहेत. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा कोणताही विचार केला जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
काय आहेत महत्वाच्या अटी?
केवळ ऑनलाईन अर्जात दावा केला म्हणून ही सवलत मिळणार नाही; त्यासाठी आयोगाची स्वतंत्र पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. लेखनिकाची शैक्षणिक पात्रता संबंधित परीक्षेच्या किमान पात्रतेपेक्षा कमी आणि उमेदवाराच्या पात्रतेपेक्षा एक टप्पा कमी असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी विनंती अर्जासोबत (प्रपत्र १ किंवा २) किमान ४० टक्के दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र आणि लेखनिकाचे आधार कार्ड सादर करणे बंधनकारक आहे.
आयोगाची मान्यता आवश्यक
दिव्यांग उमेदवारांनी प्रपत्र १ मध्ये विनंती केलेल्या अर्जानुसार पात्र लेखनिकाचा तपशील तपासून आयोगाद्वारे मान्यता दिल्यानंतर तोच लेखनिक परीक्षेसाठी ग्राह्य असेल. उमेदवारांनी प्रपत्र १ मध्ये नमूद लेखनिकच सोबत आणणे बंधनकारक आहे. अन्य व्यक्तींना ऐनवेळी लेखनिक म्हणून मान्यता देण्याची उमेदवारांची विनंती ग्राह्य धरता येणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
‘मॉक टेस्ट’ची सुविधा
संगणक प्रणालीवर आधारित (सीबीटी) परीक्षेचे स्वरूप समजून घेण्यासाठी उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘मॉक टेस्ट’ सुविधेचा वापर करावा. शासन परिपत्रकातील परिच्छेद क्र. १३ मधील तरतुदीनुसार आयोगाकडून उमेदवारांना संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा पध्दती व स्वरुप अवगत व्हावे याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Computer Based Examinations > Mock Test’ येथे एक वेबलिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यावर दिव्यांग उमेदवारांनी सराव करून संगणक प्रणालीची हाताळणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
