नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकत्याच झालेल्या नागरी सेवा पूर्व परीक्षेमध्ये एका दिवसात उत्तर तालिका जाहीर करण्याचा नवा रेकॉर्ड आयोगाने केला. त्यानंतर एमपीएससी एक धडाकेबाज निर्णय घेत आहे. रविवार, दिनांक १४ जून, २०२६ रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर होणार आहे. या परीक्षेसाठी आयोगाने नियम कठोर केले आहेत. असे असले तरी आयोगाच्या एका नियमातील चुकीमुळे तीन मिनीटांआधी एमपीएससीचा पेपर फुटत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेमका प्रकार काय पाहूया
परीक्षेदरम्यान काय गोंधळ होतो?
एमपीएससीच्या परीक्षेत पेपरची जी वेळ असेल त्याच्या तीन मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका प्रत्येक उमेदवाराला दिली जाते. प्रश्नपत्रिकेचा क्रमांक उत्तरपत्रिकेवर टाकण्यासाठी हा वेळ दिला जातो. मात्र, बहुतांश उमेदवार या वेळेतच सूचनांचे पालन न करता प्रश्नपत्रिकेचे ‘सील’ उघडून प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करतात. मात्र काही उमेदवार काटेकोरपणे सूचनांचे पालन करून जेव्हा पेपर सुरू होण्याची घंटा होते तेव्हाच प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करतात. उदाहरणार्थ ११ ते १२ या वेळेमध्ये पेपर असेल १०:५७ या वेळेला प्रश्नपत्रिका उमेदवाराच्या हातात मिळते. मात्र यानंतर प्रश्नपत्रिकेचे सील लगेच न उघडता अकरा वाजता उघडावे, अशा सूचना द्याव्या.
उमेदवारांची मागणी काय?
महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेकरीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील प्रवेशपात्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
बहुतांश उमेदवार १०:५७ या वेळेतच प्रश्नपत्रिका हाती आल्यावर लगेच सील उघडून प्रश्नपत्रिका सोडवला सुरुवात करतात. मात्र काही उमेदवार बरोबर अकरा वाजताच सूचनांचे पालन करून सील उघडतात. त्यामुळे काही उमेदवारांना तीन मिनिटे अधिकचे मिळतात. यामुळे बऱ्याचशा उमेदवारांवर अन्याय होत आहे. तरी आयोगाने या सूचनांचे पालन करून काटेकोरपणे वेळेतच प्रश्नपत्रिकेचे सील उमेदवारांनी फोडावे याबद्दल कडक सूचना देणे गरजेचे आहे.
असे आहेत अनेक निर्णय
परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतः च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
