नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांसह राज्यातील स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीत व्यापक सुधारणा करण्यासाठी अन्य राज्यांतील लोकसेवा आयोग आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) कार्यपद्धतींचाही अभ्यास केला जात आहे. अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने यासाठी नुकतीच एनटीए आणि गुजरात लोकसेवा आयोगाला भेट देऊन तेथील परीक्षा प्रक्रियेची माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या सूचना आणि अन्य संस्थांच्या परीक्षा पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास करून राज्यातील स्पर्धा परीक्षा व्यवस्थेत आवश्यक बदल सुचविण्याचा समितीचा प्रयत्न आहे.

परीक्षा प्रक्रियेत अधिक सुसूत्रता येणार

राज्यातील स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीत दीर्घकाळानंतर व्यापक सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीने राज्यातील विविध विभागीय कार्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्पर्धा परीक्षार्थींच्या अडचणी, परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी आणि अपेक्षित बदल याबाबत त्यांच्या सूचना जाणून घेण्यात आल्या. राज्यभरातून ई-मेलद्वारे समितीला ७२ हजारांहून अधिक सूचना प्राप्त झाल्या आहेत. मात्र समिती केवळ विद्यार्थ्यांच्या सूचनांवर थांबणार नसून अन्य राज्यांमधील लोकसेवा आयोग विविध स्पर्धा परीक्षा आणि केंद्रीय परीक्षा पद्धतींचा ही अभ्यास करणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षा आणि एमपीएससीमध्ये यातून आमूलाग्र बदल केले जाणार आहेत.विद्यार्थ्यांच्या सूचना आणि अन्य परीक्षा संस्थांच्या अनुभवांचा विचार करून समिती कोणत्या सुधारणा सुचविते, तसेच त्या टप्प्याटप्प्याने कधी लागू होतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. या शिफारशींमुळे राज्यातील स्पर्धा परीक्षा प्रक्रियेत अधिक सुसूत्रता येऊन उमेदवारांना भेडसावणाऱ्या अडचणी कमी होतात का, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष आहे.

अन्य संस्थांच्या परीक्षा पद्धतींचाही अभ्यास

समितीसमोरील आव्हान केवळ विद्यार्थ्यांच्या सूचनांचा विचार करण्यापुरते मर्यादित नाही. राज्यातील स्पर्धा परीक्षा अधिक पारदर्शक, सुसूत्र आणि वेळेत पार पाडण्यासाठी अन्य परीक्षा संस्थांच्या कार्यपद्धतींचा अभ्यासही महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या सूचनांसोबतच देशातील विविध लोकसेवा आयोग आणि एनटीए यांच्या परीक्षा पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास करण्यावर समितीने भर दिला आहे. याच अनुषंगाने समितीने नुकतीच एनटीए आणि गुजरात लोकसेवा आयोगाला भेट दिली. या भेटीदरम्यान संबंधित संस्थांच्या परीक्षा प्रक्रियेची माहिती घेण्यात आली. या संस्थांच्या कार्यपद्धतींचा अभ्यास करून महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा व्यवस्थेत कोणते बदल करता येतील, याचा विचार समितीकडून केला जाणार आहे.

७२ हजारांहून अधिक सूचनांचा विचार

समितीला राज्यभरातून मोठ्या संख्येने सूचना प्राप्त झाल्याने त्यांचे वर्गीकरण, त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास आणि त्याआधारे शिफारशी तयार करण्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. परीक्षा पद्धती, मूल्यमापन, परीक्षांचे नियोजन आणि उमेदवारांना भेडसावणाऱ्या अडचणी अशा विविध बाबींचा विचार करून समिती शिफारशी तयार करणार आहे. विद्यार्थ्यांच्या सूचनांसह अन्य परीक्षा संस्थांच्या पद्धतींचा अभ्यास या प्रक्रियेत उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे.

विद्यार्थ्यांचे लक्ष याकडे

दरम्यान, एमपीएससीच्या काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून, आयोगाच्या कामकाजात आणि आगामी परीक्षांच्या नियोजनात सुधारणा समितीच्या शिफारशींना महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेषतः राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप कसे असेल आणि आवश्यक सुधारणा कधी लागू होतील, याबाबत उमेदवारांना स्पष्टता हवी आहे. त्यामुळे समितीच्या शिफारशींकडे राज्यभरातील स्पर्धा परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.