नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध भरती प्रक्रियांमध्ये कथित गैरप्रकार, मूल्यांकनाबाबतचे आक्षेप, न्यायालयीन प्रकरणे आणि चौकशी यांमुळे उमेदवारांना अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे. काही परीक्षांच्या प्रक्रियेवर चौकशीचे सावट आहे, काही परीक्षांचे निकाल आणि नियुक्त्या रखडल्या आहेत, तर राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातच राज्य सेवा, स्थापत्य अभियांत्रिकी आणि गट-ब च्या मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने हजारो उमेदवारांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्पर्धा परीक्षांसाठी अनेक वर्षे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा, निकाल, शिफारस यादी आणि नियुक्ती या प्रत्येक टप्प्यावर प्रतीक्षा करावी लागत आहे. भरती प्रक्रियेतील अनिश्चिततेमुळे विद्यार्थ्यांचे वय वाढत असून, आर्थिक खर्च आणि मानसिक ताणही वाढत आहे. त्यामुळे ‘एमपीएससी’च्या परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि चौकशीच्या प्रक्रियेचा फटका नेमका कोणत्या भरतींना बसला? असा प्रश्न केला जात आहे.
औषध निरीक्षक (गट-ब) पदभरती प्रक्रिया कथित पेपरफुटीमुळे सर्वाधिक चर्चेत आली. या परीक्षेचा १२ जूनला निकाल जाहीर झाला आणि १ ते २२ जुलैदरम्यान मुलाखतींची प्रक्रिया पार पडली. मात्र, परीक्षेतील गैरप्रकारांच्या आरोपांनंतर गुन्हे शाखा आणि विशेष तपास पथकाकडून तपास करण्यात आला. या प्रकरणात अटकसत्र आणि गुन्हे दाखल झाल्यानंतर २६ ऑगस्टला परीक्षा रद्द करण्यात आली. परिणामी, या भरतीमधील गोंधळाचा परिणाम इतर परीक्षांवरही झाला असून तयारी करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे.
शिफारशीनंतरही नियुक्त्या नाहीत
महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२४ च्या प्रक्रियेतही उमेदवारांच्या अडचणी कायम आहेत. १७ जून २०२६ रोजी या परीक्षेची अंतिम शिफारस यादी प्रसिद्ध झाली. मात्र, नियुक्त्यांची प्रक्रिया अद्याप प्रलंबित असल्याने निवड झालेल्या उमेदवारांची प्रतीक्षा संपलेली नाही. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ च्या प्रक्रियेतही नियुक्त्यांचा प्रश्न कायम आहे. या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रियेचाही उमेदवारांच्या पुढील वाटचालीवर परिणाम होत आहे.
राजपत्रित, गट-ब आणि गट-क परीक्षांवरही प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा २०२५, गट-ब संयुक्त परीक्षा २०२५ आणि गट-क संयुक्त परीक्षा २०२५ या परीक्षांच्या प्रक्रियेबाबतही चौकशी किंवा न्यायालयीन प्रक्रियेचा उल्लेख करण्यात आला आहे. गट-ब मुख्य परीक्षा १७ मे २०२६ रोजी, तर गट-कची मुख्य परीक्षा १२ जुलै २०२६ रोजी पार पडली. या परीक्षा पूर्ण झाल्यानंतरही पुढील निवड प्रक्रियेबाबत अनिश्चितता कायम असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
पुनर्मूल्यांकनामुळे मुख्य परीक्षा लांबणीवर
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाबाबत विद्यार्थी संघटना आणि उमेदवारांनी आक्षेप नोंदवले होते. त्यानंतर आयोगाने उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर ३ ऑक्टोबर २०२६ पासून नियोजित राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा २०२६ आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
परीक्षा प्रक्रियेतील विलंबाबाबत चिंता
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी परीक्षा प्रक्रियेतील विलंबाबाबत चिंता व्यक्त केली आहे. परीक्षा पुढे ढकलणे, निकालांना विलंब आणि नियुक्त्या रखडणे यामुळे विद्यार्थ्यांचे वय वाढत आहे. अभ्यासासाठी केलेला खर्च, खासगी शिकवणीचे शुल्क, निवास आणि दैनंदिन खर्च यांचा आर्थिक भारही वाढत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शेतीतील संकट आणि कुटुंबाची आर्थिक ओढाताण यांचा अतिरिक्त सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘एमपीएससी’ला कुठल्याही परीक्षा स्थगित करण्याचे आदेश आम्ही दिलेली नाही. त्यांनी परीक्षेतील सुधारणांच्या धर्तीवर परस्पर निर्णय घेतलेला आहे. – व्ही राधा, अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन.
