नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमध्ये कथित गैरप्रकारांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. औषध निरीक्षकपदाच्या पेपरफुटी प्रकरणानंतर आता राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक (गट-क) पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा ‘मार्किंग पॅटर्न’ फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. या परीक्षेशी संबंधित गोपनीय दस्तऐवज उघड झाल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात सहसचिवांसह इतर दोषींवर कारवाई करण्यासाठी अहवाल आयोगाकडे पाठवण्यात आल्याची माहिती नागपूर पोलिसांच्या चौकशी अहवालातून समोर आली आहे. या प्रकरणी नवी मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत दोष आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. असे असतानाही आयोगाने अद्यापही या दोषिंवर कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आयोग कुणाचा बचाव करत आहे असाही सवाल पुढे आला आहे.
नागपूर पोलीस काय म्हणाले?
एमपीएससीच्या परीक्षेसंबंधी गोपनीय दस्तऐवज उघड झाल्याचा आरोप करीत रवींद्र दिनकर इंगोले यांच्यासह १५ उमेदवारांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीच्या चौकशीसाठी तो अर्ज नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे पाठविण्यात आला होता. चौकशीदरम्यान तक्रारीतील अर्जदारांपैकी अमोल श्रीराम जाधव यांच्याशी पोलिसांनी संपर्क साधून त्यांचा जबाब नोंदवला. जाधव यांनी या प्रकरणासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट), नागपूर खंडपीठात अर्ज क्रमांक ११८९/२०२५ दाखल केल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणाची सुनावणी सुरू असल्याने ते न्यायप्रविष्ट असल्याचेही चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, याच प्रकरणासंदर्भात नवी मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक दोनमध्येही तक्रार दाखल करण्यात आल्याचे चौकशीत समोर आले. नागपूर पोलिसांनी नवी मुंबई गुन्हे शाखेचे चौकशी अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित तक्रारीची चौकशी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई पोलीस काय म्हणाले?
चौकशीत एमपीएससीचे सहसचिव आणि इतर काही जण दोषी आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे अहवाल पाठवण्यात आल्याचे नवी मुंबई गुन्हे शाखेने स्पष्ट केले. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षेतील गोपनीयतेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या गंभीर प्रश्नांना या चौकशी अहवालामुळे नवे वळण मिळाले आहे. दरम्यान, संबंधित प्रकरण मॅटमध्ये न्यायप्रविष्ट असून त्यावर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांच्या चौकशी अहवालानुसार तक्रारदारांच्या तक्रारीचे निराकरण झाल्याचे नमूद करून तक्रार अर्ज दफ्तरी दाखल करण्याचा अहवाल पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांनी सादर केला आहे.
