नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ०४ जानेवारी, २०२६ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ या परीक्षेमधून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल २३ मार्च, २०२६ रोजी जाहीर करण्यात येत आहे. प्रस्तुत पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सोमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
६७४ पदांसाठी झाली परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय), राज्य कर निरीक्षक (एसटीआय) आणि सहायक कक्ष अधिकारी (एएसओ) यासाठी संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाते. यंदा ६७४ पदांसाठी जाहिरात देण्यात आली. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी ३, राज्य कर निरीक्षक २७९ पदे आणि पोलीस उपनिरीक्षकाच्या ३९२ पदांचा समावेश आहे. सुरुवातीला संयुक्त पूर्व गट ‘ब’ २०२५ (अराजपात्रित) परीक्षा ९ नोव्हेंबरला होणार होती. मात्र, महाराष्ट्राच्या काही भागात आलेल्या पूर परिस्थितीमुळे राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली. ती परीक्षा नोव्हेंबर महिन्यात झाल्याने त्याचा परिणाम संयुक्त पूर्व परीक्षेवर झाला. यानंतर २१ डिसेंबरला संयुक्त पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. मात्र, यातही अडचण आली होती.
https://mpsc.gov.in/6c512815-fd2f-4695-8c40-82d3f481b84e
निवडणुकांमुळे पुढे गेली होती परीक्षा
निवडणूक आयोगाने सुरुवातीला २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणीची तयारी केली होती. मात्र, न्यायलयीन खटल्यांचा पेच निर्माण झाल्याने तेथील मंगळवारी होणारी काही पालिकांमधील निवडणूक २० डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे २ आणि २० डिसेंबर रोजी मिळून दोन्ही टप्प्यांतले मतदान पार पडल्यानंतर सर्व नगरपालिका व नगर पंचायतींचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्व महसुली अधिकारी मतमोजणीच्या प्रक्रियेत व्यस्त राहणार असल्याने ‘एमपीएससी’ २१ डिसेंबरला होणारी परीक्षा पुढे ढकलून ती ४ जानेवारीला घेण्यात आली.

https://mpsc.gov.in/home
विद्यार्थ्यांनाे या सूचनांवर लक्ष द्या
- उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या तसेच परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.
- आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.
- प्रस्तुत परीक्षेचा निकाल आरक्षणाच्या/समांतर आरक्षणाच्या मुद्यांसंदर्भात विविध मा. न्यायालयात /मा. न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
- मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरीता ग्राह्य ठरतील.
