नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत ५५२ पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ( एमपीएससी) ‘महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६’ रविवार १४ जून २०२६ रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. परीक्षेसाठी विद्यार्थी अर्जही करत आहेत. परंतु, या भरतीप्रक्रियेमध्ये सर्वाधिक पदे असलेल्या सहायक कक्ष अधिकारी व राज्य कर निरीक्षक या दोन्ही पदांमध्ये अनुसूचित जातीसाठी शुन्य जागा असल्याने थेट राष्ट्रीय काँग्रेसने यावर आक्षेप घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आक्षेप काय?
‘एमपीएससी’च्या जाहिरातींवर अनेकदा आक्षेप घेतला जातो. संयुक्त परीक्षेमध्ये मोठ्या संख्येने पदांचा समावेश असल्याने लाखो परीक्षार्थी या परीक्षेची वाट बघत असतात. परंतु, जाहिरातीमध्ये अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जागा नसल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.
जाहिरातीमध्ये सहायक कक्ष अधिकारी गट-ब ६ पदे, राज्य कर निरीक्षक गट-ब (वित्त विभाग)२३६ पदे, पोलीस उपनिरीक्षक, गट-ब ३१० पदे अशा एकूण ५५२ पदांचा समावेश आहे. परंतु, यात अनुसूचित जातीच्या उमदेवारांसाठी जागा नसल्याने उमेदवारांचा भ्रमनिराश झाला आहे. यावर राष्ट्रीय काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.
काँग्रेसच्या निवेदनानुसार, महाराष्ट्र अराजपत्रीत गट ब पूर्व परीक्षा २०२६ जाहिरातीमध्ये सहायक कक्ष अधिकारी या पदाच्या अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा व राज्य कर निरीक्षक या पदाच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा आलेल्या आहेत. सोबतच पोलिस उपनिरिक्षक पदासाठी आलेल्या जागेत अनुसूचित जाती प्रवर्गातील वयबाद झालेले विद्यार्थी व शारीरिक पात्रतेसाठी अपात्र ठरत आहेत.
या कारणाने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत विचार करावा व राज्य सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली नाही तर अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही दिला.
‘एमपीएससी’कडे शासन पदांची मागणी करतो. पदांची उपलब्धता ही बिंदूनामावलीनुसार ठरते. त्यात ज्या पदांचा अनुशेष आहे त्या पदांचे मागणीपत्र येते. त्यानुसार जाहिरात तयार होते. ‘एमपीएससी’चा त्यात काहीही हस्तक्षेप नसतो. आयोग कुणाचेच आरक्षण ठरवत नाही. पुढे पदसंख्या आणि आरक्षणात बदल झाला तर त्यात समावेश केले जाते. – महेंद्र हरपाळकर, सचिव, एमपीएससी.
एमपीएससीचे म्हणणे काय?
आयोगामार्फत शासनाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार जाहिरात क्रमांक ०११/२०२६ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील हा शासनाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार दर्शविण्यात आला आहे.
