नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकत्याच झालेल्या नागरी सेवा पूर्व परीक्षेमध्ये एका दिवसात उत्तर तालिका जाहीर करण्याचा नवा रेकॉर्ड आयोगाने केला. त्यानंतर एमपीएससी एक धडाकेबाज निर्णय घेत आहे. रविवार, दिनांक १४ जून, २०२६ रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर होणार आहे. या परीक्षेसाठी आयोगाने नियम कठोर. केले आहेत. एमपीएससी च्या परीक्षा द्यायच्या असतील तर आता उमेदवारांना दीड तास आधी परीक्षा केंद्रावर जावे लागणार आहे. आयोगाची नियमावली काय आहे ते पाहूया.

हे नियमही बघा

महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेकरीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील प्रवेशपात्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.

असे आहेत कठोर निर्णय

परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतः च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.

संकेतस्थळाला भेट द्या

आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील गायडन्स ऑफ एक्झामिनेशन या सदराखाली उपलब्ध असलेल्या ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना’ यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. आयोगाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधीसाठी अथवा कायमस्वरुपी प्रतिरोधनाची तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.