नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय (ऑप्टिंग आऊट) आणि बहुसंवर्गीय पदांच्या भरतीसाठी प्रतीक्षा यादी बंद करण्याचा घेतलेला निर्णय पहिल्याच परीक्षेत अडचणीचा ठरत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) संयुक्त सेवा पूर्व परीक्षा २०२५च्या अंतिम निकालात उपनिबंधक आणि राज्य कर निरीक्षक या दोन्ही पदांवर ७६ उमेदवारांची दुहेरी निवड झाली . त्यामुळे एकाच उमेदवाराची दोन पदांवर निवड होऊन प्रत्यक्षात एकाच पदावर नियुक्ती होणार असल्याने उर्वरित ७६ जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. परिणामी पात्र उमेदवारांना संधीपासून वंचित राहावे लागू शकते. ही परिस्थिती टाळण्यासाठी आयोगाने तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे. तसेच अनेक लोकप्रतिनिधीही याविषयावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या निर्णयामध्ये बदल होण्यासंदर्भात आयोगामध्ये कुठली चर्चा आहे ते बघा.

असा आहे धोका?

‘एमपीएससी’ने स्पर्धा परीक्षांतील उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय २०२२-२३च्या सुमारास लागू केला होता. मात्र, १३ मे रोजीच्या परिपत्रकानुसार ‘ऑप्टिंग आऊट’सह संमती विकल्प देण्याची सुविधा रद्द करण्यात आली. बहुसंवर्गीय पदांच्या भरती प्रक्रियेत प्रतीक्षा यादी ठेवली जाणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले. या निर्णयाचा परिणाम आता गट-ब संयुक्त सेवा परीक्षेच्या निकालानंतर समोर आला आहे. या परीक्षेच्या जाहिरातीमध्ये उपनिबंधकाची ८४, राज्य कर निरीक्षकाची २७९, सहाय्यक विभाग अधिकाऱ्याची (एएसओ) तीन आणि पोलीस उपनिरीक्षकाची (पीएसआय) ३९२ अशी एकूण ७५८ पदे होती. अंतिम निकाल १४ ऑगस्ट रोजी जाहीर झाला. त्यामध्ये ७६ उमेदवारांची एकापेक्षा अधिक पदांसाठी निवड झाल्याचे समोर आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुहेरी निवडीमुळे निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी आयोगाने ‘एक उमेदवार, एक पद’ या तत्त्वाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

पदांची उपलब्धता आणि पुढील निवडीचा पेच

विशेष म्हणजे, उपनिबंधक पदाच्या जाहिरातीमुळे अनेक एएसओ, एसटीआय आणि पीएसआय पदांवर कार्यरत उमेदवारांनीही ही परीक्षा दिली. काही उमेदवारांची उपनिबंधकपदी निवड झाली नसली तरी ते एसटीआय किंवा अन्य पदांच्या यादीत आहेत. अशा उमेदवारांना पुढील प्रक्रियेतून बाहेर पडण्याची स्पष्ट व्यवस्था नसल्याने प्रत्यक्ष उपलब्ध पदे आणि पुढील निवड याबाबत गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता आहे.

पीएसआयच्या ३९२ जागांवर परिणामाची भीती

दुहेरी निवड झालेल्या उमेदवारांचा प्रश्न निकाली न काढता पुढील प्रक्रिया राबवल्यास पोलीस उपनिरीक्षक पदाच्या (पीएसआय)शारीरिक चाचणीसाठी तयार होणाऱ्या यादीत एसटीआय किंवा उपनिबंधकपदी निवड झालेल्या उमेदवारांचाही समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीएसआय पदासाठी पात्र असलेल्या अन्य उमेदवारांच्या संधीवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती उमेदवारांनी व्यक्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गट ब परीक्षेनंतर राज्य सरकारने आयोगाकडे यासंदर्भात माहिती मागितली आहे. त्यामुळे काही दिवसांत पुन्हा पसंती क्रम किंवा प्रतीक्षा यादीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.