नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा गट-कसाठी तब्बल १० लाख ८६ हजार ५३८ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. विविध १४ संवर्गांतील ५,७०० हून अधिक पदांसाठी होणाऱ्या या भरतीत लाखो उमेदवारांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. उपलब्ध पदांच्या तुलनेत अर्जांची संख्या प्रचंड असल्याने सरकारी नोकरीसाठी तरुणांमध्ये असलेली स्पर्धा पुन्हा अधोरेखित झाली आहे.
गट-क परीक्षेसाठी राज्यभरातून १० लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी या परीक्षेच्या माध्यमातून सरकारी सेवेत प्रवेश मिळविण्यासाठी तयारी करीत आहेत. मात्र, पदांची संख्या मर्यादित आणि उमेदवारांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक पदासाठी मोठी चुरस निर्माण होणार आहे.
एका पदामागे सरासरी किती उमेदवार?
१० लाख ८६ हजार ५३८ अर्ज आणि ५,७०० हून अधिक पदे अशी आकडेवारी पाहता, एका पदासाठी सरासरी १९० पेक्षा अधिक उमेदवार स्पर्धेत असण्याची शक्यता आहे. अंतिम पदसंख्या आणि अर्जांची विभागणी यानुसार ही संख्या बदलू शकते. त्यामुळे गट-कची परीक्षा राज्यातील स्पर्धा परीक्षार्थींसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
रिक्त पदांचाही समावेश करा
मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज केल्याच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या भरतीमध्ये आणखी रिक्त पदांचा समावेश करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली आहे.
“गट-क परीक्षेसाठी आलेली १० लाख ८६ हजार ५३८ अर्जांची संख्या पाहता राज्यातील रोजगाराच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते. एवढ्या मोठ्या संख्येने तरुण नोकरीसाठी परीक्षा देत आहेत. त्यामुळे या भरतीमध्ये रिक्त असलेली पदेही समाविष्ट करण्यात यावीत. जास्तीत जास्त पदांसाठी परीक्षा घेऊन तरुणांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून द्याव्यात,” अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी केली.
अर्जसंख्येने रोजगाराचा मुद्दा चर्चेत
गट-क परीक्षेसाठी आलेली दहा लाखांहून अधिक अर्जसंख्या ही केवळ स्पर्धेची आकडेवारी नसून सरकारी रोजगाराच्या मागणीचेही चित्र असल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतरही मोठ्या संख्येने तरुण सरकारी सेवेकडे वळत असल्याने उपलब्ध रिक्त पदे वेळेत भरण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी प्रसिद्ध केली आहे. आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही परीक्षा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित केली जाणार होती. मात्र, आता नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा 3/३ जानेवारी २०२७रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर होणार आहे
