नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ रविवार, १२ जुलै रोजी राज्यातील सहा विभागीय केंद्रांवर होणार आहे. मात्र, राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते, पूल आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने परीक्षार्थ्यांना केंद्रांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काही विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत आहे.
गट-क मुख्य परीक्षेसाठी राज्यभरातून ३१ हजारांहून अधिक उमेदवार पात्र ठरले. त्यापैकी सर्वाधिक १३ हजारांपेक्षा अधिक परीक्षार्थी पुणे विभागीय केंद्रावर परीक्षा देणार आहेत. याशिवाय मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या विभागीय केंद्रांवरही परीक्षा होणार आहे. अनेक उमेदवारांना दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा दुर्गम भागांतून प्रवास करून परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागणार आहे. सततच्या पावसामुळे काही राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला असून, अनेक भागांतील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नियोजित वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता येईल का, याबाबत उमेदवारांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ साठी सुरुवातीला ९३८ रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. शासनाकडून सुधारित मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतर पदसंख्या वाढवून १,७४१ करण्यात आली. पूर्व परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर झाला. मुख्य परीक्षा सुरुवातीला ७ जून रोजी होणार होती; मात्र ती पुढे ढकलून १२ जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. आता पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांची मागणी
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, काही भागांत रेल्वे आणि बससेवेवरही पावसाचा परिणाम झाला आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रवास अधिक धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे परीक्षार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी सामाजिक माध्यमांसह विविध विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.
राज्यात मुसळधार पावसाची स्थिती असल्याने काही भागांत रेल्वे आणि बससेवेवरही पावसाचा परिणाम झाला आहे. तसेच सर्वाधिक विद्यार्थी हे पुण्यात असून येथे पूर परिस्थिती आहे. त्यामुळे परीक्षार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा.-महेश घरबुडे. अध्यक्ष ,स्पर्धा परीक्षा विध्यार्थी असोसिएशन.
