नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ च्या पदसंख्येत तब्बल ३ हजार ८८ पदांची मोठी वाढ जाहीर केली असून, यामुळे भरती प्रक्रियेतील एकूण पदांची संख्या आता थेट ५,७०७ वर पोहोचली आहे. या परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यासाठी पूर्व नियोजित १० ऑगस्ट २०२६ ची मुदत वाढवून देण्यात आली होती. एमपीएससीने २५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या मूळ जाहिरातीनुसार (क्र. ०१७/२०२६) सुरुवातीला २६१९ रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली होती.
परंतु सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय आणि विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या नवीन मागणीपत्रांनुसार आयोगाने अतिरिक्त ३०८८ पदांचा या परीक्षेत समावेश केला. यामुळे एकूण पदसंख्या ५,७०७ झाली असून यामध्ये बहुप्रतिक्षित तलाठी पदाचाही समावेश करण्यात आला आहे. या भरतीसाठी महाराष्ट्रातून तब्बल १२ लाख ६३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत त्यामुळे पाच हजार जागांसाठी प्रचंड मोठी स्पर्धा असल्याचे दिसून येते.
भरतीतील महत्त्वाची पदे
१. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (महसूल व वन विभाग): १,५३९ पदे (पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी)
२. लिपिक-टंकलेखक (महसूल व वन विभाग): ४८० पदे
३. लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग): ३३९ पदे
४. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक): २५४ पदे (पात्रता: B.F.Sc. पदवी)
५. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय: २३० पदे
६. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग: १५५ पदे
७. आदिवासी विकास विभाग: ६९ पदे
८. सहायक अधीक्षक (कृषि व पदुम विभाग): ११ पदे
९. वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल: ११ पदे
आयोगाचे उमेदवारांना विशेष आवाहन
पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी विविध विभागांचे आरक्षणनिहाय अतिरिक्त तक्ते प्रसिद्ध केले जातील. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने पदसंख्या कमी आहे किंवा विशिष्ट संवर्गाचा समावेश नाही असे समजून अर्ज भरण्याचे टाळू नये. अंतिम तासांत संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी सर्व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा, असे आवाहन आयोगाने केले आहे. अधिकृत माहिती व अर्जासाठी उमेदवारांनी mpsc.gov.in किंवा mpsconline.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
