नागपूर: राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील महा-ई-सेवा केंद्रांचे कामकाज प्रभावित झाले. याचा फटका महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गट ‘क’ भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करणाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत किमान तीन ते पाच दिवसांनी वाढवावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनने केली आहे. यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी आयोगाच्या सचिवांना निवेदन पाठवले आहे.

निवेदनात नेमकी मागणी काय?

निवेदनात म्हटले आहे की, आयोगाने गट ‘क’ संवर्गातील मोठ्या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर राज्यभरातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यंदा भरती प्रक्रियेत तलाठी पदांचाही समावेश करण्यात आल्याने मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज करण्यास इच्छुक आहेत. मात्र, राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील महा-ई-सेवा केंद्रांचे कामकाज प्रभावित झाले. त्यामुळे अनेक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून घेता आली नसल्याचा दावा संघटनेने केला आहे.

आयोगाचे संकेतस्थळही संथ

याशिवाय, गेल्या दोन-तीन दिवसांपासून एमपीएससीचे संकेतस्थळ संथ गतीने कार्यरत असल्याने अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत आहेत. अर्ज सादर करताना अनेक उमेदवारांना वारंवार अडथळ्यांचा सामना करावा लागत असून, अंतिम मुदतीपूर्वी अर्ज पूर्ण करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर तांत्रिक अडचणी आणि पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत किमान तीन ते पाच दिवसांनी वाढवावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनने केली आहे. यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्व पात्र उमेदवारांना समान संधी मिळेल आणि कोणत्याही विद्यार्थ्याचे केवळ तांत्रिक किंवा नैसर्गिक अडचणींमुळे नुकसान होणार नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे.

आता या मागणीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग काय निर्णय घेतो, याकडे राज्यातील हजारो स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे लक्ष लागले आहे.