लोकसत्ता टीम
नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा-२०२३ लिपिक टंकलेखक आणि कर सहायक, या संवर्गाकरता घेण्यात येणारी टंकलेखन कौशल्य चाचणी परीक्षा आणि त्यानंतर या परीक्षेचा निकालही कायमच वादात सापडला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. जुलै महिन्यात टंकलेखन परीक्षा घेण्यात आली असली तरी विविध कारणांनी या परीक्षेचा निकाल आणि नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.
स्वतंत्र परीक्षेचा झाला होता निर्णय
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा परीक्षेमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार गट ब आणि गट क सेवेतील विविध संवर्गांची स्वतंत्र पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही सेवांसाठी अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणेच राहणार असून, गट ब आणि गट क असा सेवानिहाय पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ साठी जाहिरात प्रसिद्ध करून दोन्ही सेवांची संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली होती.
आणखी वाचा-गोंदिया विधानसभेत पुन्हा अग्रवाल विरुद्ध अग्रवाल…प्रफुल्ल पटेलांचा प्रभाव भेेदून…
टंकलेखन कौशल्य चाचणी
एमपीएससीच्या गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा-२०२३नंतर यात पात्र उमेदवारांची टंकलेखन चाचणी परीक्षा घेण्यात आली. मात्र, या परीक्षेदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी आल्या. यामुळे उमेदवारांनी परीक्षा पद्धतीवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या परीक्षेत काही विद्यार्थ्यांना जुने संगणक दिल्याचा आरोपही केला होता. यावर एमपीएससीला पत्र लिहून नव्याने परीक्षा घेण्याची विनंती केली होती. शेवटी उमेदवारांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. आयोगाने गट-क च्या तेराशे जागांसाठी जाहिरात काढली आहे. त्यामुळे या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अशा तांत्रिक अडचण येणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
आणखी वाचा-दिवाळीपूर्वीच सोने- चांदीच्या दरात घट… हे आहे आजचे दर…
‘एमपीएससी’चे म्हणणे काय?
आयोगामार्फत विषयांकित पदांची मुख्य परीक्षा १७ डिसेंबर, २०२३ रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी ०४ ते १३ जुलै २०२४ या कालावधीत घेण्यात आली असून सदर टंकलेखन कौशल्य चाचणीत उत्तीर्ण तसेच अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर ३० सप्टेंबर, २०२४ रोजी जाहीर करण्यात आली होती. सदर टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे याचिका दाखल करण्यात आली. ही न्यायिक प्रकरणे विचारात घेता ‘लिपिक-टंकलेखक’ व कर सहायक या संवर्गाच्या अंतिम निकालाची कार्यवाही सद्यस्थितीत प्रलंबित आहे. यासंदर्भात न्यायाधिकरणाच्या न्यायनिर्णयानंतरच पुढील कार्यवाही करणे शक्य होईल.