नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारावर आणि निष्पक्षतेवर रोज नव-नवीन प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, आयोगाच्या भोंगळ व्यवस्थापनामु‌ळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. अन्न व औषध प्रशासनातील ‘ड्रग इन्स्पेक्टर’ परीक्षेचा पेपर थेट ‘एमपीएससी’च्या अवर सचिवासह दोन कर्मचाऱ्यांनीच विकल्याचे उघडकीस आले असतानाच, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अचाट आणि अशक्यप्राय ‘कटऑफ’ने संपूर्ण उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह आहेत. त्यानंतर आता राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर होताच पुन्हा एकदा विविध प्रश्न उपस्थित झालेले आहेत. यूपीएससीपेक्षा २०० गुणांनी जास्त ‘कटऑफ’ कसा? असा संभ्रम काही विद्यार्थ्यांमध्ये उपस्थित झाला आहे. नेमका काय गोंधळ झाला बघा.

आकडेवारीचा धक्का कसा, काय गोंधळ झाला?

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आणि एमपीएससीचा (MPSC) मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम एकच (१७५० गुण) असताना, दोन्ही संस्थांच्या मुख्य परीक्षेच्या ‘कटऑफ’ मधील तफावत थक्क करणारी आहे असा आरोप आहे.
यूपीएससी मुख्य परीक्षा २०२५ कटऑफ (एकूण १७५० पैकी): ओपन / जनरल : ७३९ गुण
एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ कटऑफः ओपन / जनरल : ९४२ गुणअराखीव महिला : थेट ९५९ गुण (राज्यात नोंदवला गेलेला सर्वोच्च कटऑफ)

एकाच अभ्यासक्रमावर आधारित परीक्षेत एमपीएससीचा ‘ओपन जनरल’ कटऑफ युपीएससीपेक्षा तब्बल २०३ गुणांनी, तर ‘महिला’ कटऑफ २२० गुणांनी जास्त कसा जाऊ शकतो? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यासक्रम एकच, मग कटऑफमध्ये २२० गुणांचा फरक कसा? अन्न व औषध प्रशासन निरीक्षक पेपरफुटीनंतर आता राज्यसेवेच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यामुळे बहुपर्यायी प्रश्नपत्रिका हाच उपाय असल्याचे उमेदवारांचे मत आहे.

दुसरी बाजू काय ?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेमध्ये वर्णनात्मक परीक्षा लागू केली आहे. याला काही विद्यार्थ्यांचा विरोध असला तरी अनेक विद्यार्थी वर्णनात्मक परीक्षेच्या बाजूने आहेत. वर्णनात्मक परीक्षा मुळे खऱ्या आणि अभ्यास विद्यार्थ्यांना न्याय मिळतो असेही अनेक विद्यार्थी म्हणतात त्यामुळे काही विद्यार्थी बहुपर्यायी परीक्षेची मागणी करत असले तरी अनेकांचा पाठिंबा हा वर्णनात्मक परीक्षेलाही आहे. वर्णनात्मक परीक्षा पद्धतीतील धोके समोर येताना दिसत आहेत.

वर्णनात्मक पॅटर्न म्हणजे गैरव्यवहाराची साखळी?

ड्रग इन्स्पेक्टर प्रकरणात आयोगाचे स्वतःचेच अधिकारी सामील असल्याचे सिद्ध झाल्याने वर्णनात्मक परीक्षा पद्धतीतील भयानक धोके समोर आले आहेतः

१. पेपर फुटी व फेरफाराचा धोकाः हस्तलिखित उत्तरपत्रिका, कस्टडी आणि तपासणीच्या साखळीत अधिकारी भ्रष्ट असतील, तर उत्तरपत्रिका बदलणे, विशिष्ट उमेदवारांना गुण उधळून देणे आणि गोपनीयतेचा भंग करणे वर्णनात्मक पॅटर्नमध्ये अत्यंत सुलभ असते.

२. मूल्यांकनातील असमानता व पक्षपातः ओळखीच्या किंवा ‘सेटिंग’ केलेल्या उमेदवारांना डिस्क्रिप्टिव्हमध्ये हवे तसे गुण देऊन कटऑफ अनैसर्गिकरीत्या ९५० च्या पार नेला जाऊ शकतो.

Marksheet
वर्णनात्मक परीक्षा पद्धतीतील धोके समोर येताना दिसत आहेत. (फोटो- लोकसत्ता टीम)

मानवी हस्तक्षेप शून्य करणारा ‘ऑब्जेक्टिव्ह’ पॅटर्नच हवा

आयोगातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची साखळी आणि संशयास्पद मूल्यमापन पद्धत उध्वस्त करायची असेल, तर राज्यसेवा मुख्य परीक्षा १००% पूर्ववत ‘वस्तुनिष्ठ’ (Objective – MCQ) करणे हाच एकमेव मार्ग उरतो.

१००% संगणकीकृत तपासणीः ओएमआर (OMR) उत्तरपत्रिका संगणकाद्वारे तपासल्या जात असल्याने कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला गुणांमध्ये फेरफार करता येत नाही.

समान व संशयातीत निकषः योग्य उत्तराला गुण आणि चुकीच्या उत्तराला नकारात्मक गुण मिळतात, ज्यामुळे ‘अशक्य’ आणि संशयास्पद कटऑफ लागण्याचा प्रश्नच उ‌द्भवत नाही.

वि‌द्यार्थी रस्त्यावर उतरणार

आयोगाच्या स्वतःच्या अवर सचिवांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंतची टोळीच पेपरफुटीत गळ्यापर्यंत रुतलेली असताना आणि मूल्यांकनात २००-२०० गुणांची उघडीबोडगी उधळप‌ट्टी होत असताना, एमपीएससीची विश्वासार्हताही धुळीस मिळाली आहे. अशा संशयास्पद वातावरणात ‘वर्णनात्मक’ पॅटर्न लादणे म्हणजे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बळी देऊन भ्रष्टाचाराचे नवीन रस्ते मोकळे करून देणेच ठरेल. हा भोंगळ कारभार रोखण्यासाठी आणि गुणवतेचा अधिकार टिकवण्यासाठी एमपीएससीने सर्व हट्ट बाजूला सारून आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी ‘वस्तुनिष्ठ’ पॅटर्नच पूर्ववत लागू करावा, अन्यथा राज्यभरातील वि‌द्यार्थी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींनी दिला आहे.