नागपूर: नगरपालिका आणि नगर पंचायतींचे २ आणि २० डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची मतमोजणी ही एकत्रित २१ डिसेंबरला होणार आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र गट ‘ब’ अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २१ डिसेंबरला होणार आहे. जिल्हा पातळीवर परीक्षेची संपूर्ण जबाबदारी ही जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाकडे असते. जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल विभागातील सर्व कर्मचारी हे २१ डिसेंबरला मतमोजणीत व्यग्र राहणार आहे. त्यामुळे २१ डिसेंबरची संयुक्त पूर्व परीक्षा होणार की पुन्हा पुढे ढकलली जाणार? असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला हाेता. यावर आता अंतिम उत्तर एमपीएससीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नाव न सांगण्याच्या अटीवरून मिळाले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय), राज्य कर निरीक्षक (एसटीआय) आणि सहायक कक्ष अधिकारी (एएसओ) यासाठी संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाते. यंदा ६७४ पदांसाठी जाहिरात देण्यात आली. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी ३, राज्य कर निरीक्षक २७९ पदे आणि पोलीस उपनिरीक्षकाच्या ३९२ पदांचा समावेश आहे. सुरुवातीला संयुक्त पूर्व गट ‘ब’ २०२५ (अराजपात्रित) परीक्षा ९ नोव्हेंबरला होणार होती. मात्र, महाराष्ट्राच्या काही भागात आलेल्या पूर परिस्थितीमुळे राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली. ती परीक्षा नोव्हेंबर महिन्यात झाल्याने त्याचा परिणाम संयुक्त पूर्व परीक्षेवर झाला. यानंतर २१ डिसेंबरला संयुक्त पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय झाला.

निवडणूक आयोगाने सुरुवातीला २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणीची तयारी केली होती. मात्र, न्यायलयीन खटल्यांचा पेच निर्माण झाल्याने तेथील मंगळवारी होणारी काही पालिकांमधील निवडणूक २० डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे २ आणि २० डिसेंबर रोजी मिळून दोन्ही टप्प्यांतले मतदान पार पडल्यानंतर सर्व नगरपालिका व नगर पंचायतींचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्व महसुली अधिकारी मतमोजणीच्या प्रक्रियेत व्यस्त राहणार असल्याने ‘एमपीएससी’ २१ डिसेंबरला परीक्षा घेणार की पुन्हा पुढे ढकलणार? असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला होता.

असे आहे नवीन नियोजन

एकाच दिवशी परीक्षा व मतदान मोजणी असल्याने परीक्षा घेणे कठीण जाणार आहे. परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ हवे असते. तसेच खासगी मनुष्यबळ घेता येत नाही. संपूर्ण भार हा जिल्हाधिकारी कार्यालयावर असतो. मात्र, महसूल अधिकारी मतमोजणीमध्ये व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याशिवाय पर्याय राहणार नाही. नवीन तारीखेचा शोध सुरू असल्याचे आयोगातील एका सदस्याने सांगितले.