नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयाचे अर्थात एमपीएससीचं (MPSC) अधिकृत ट्विटर हँडल सुरु करण्यात आले आहे. २०२१ मध्ये याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली होती. या ट्विटर हॅण्डलवरून महत्त्वाची प्रसिद्धीपत्रकं, महत्त्वाच्या अपडेट्स प्रसिद्ध करण्यात येतील, अशी देखील माहिती देण्यात आली होती. मात्र, विद्यार्थ्यांना अधिकृत अपडेट्स देण्यासाठी सुरु केलेल्या या हँडलने आपल्या पहिल्याच ट्विटला रिप्लायचा ऑप्शन बंद करून ठेवला होता.
त्यामुळे, एमपीएससीचं हे ट्विटर हँडल सुरु झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आतच टीकेचं धनी झालेलं पाहायला मिळाले होते. आता मात्र एमपीएससीने ट्विटरवर अपडेट माहिती देणेच बंद केले आहे. यावर केवळ अधिकाऱ्यांच्या पदग्रहणाची माहितीच दिली जात आहे. त्यामुळे एमपीएससीचे हे ट्विटर खाते कुणाच्या कामाचे असा प्रश्न विचारला जात आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळण्यासाठी एमपीएससीकडून हा रिप्लायचा ऑप्शन बंद करण्यात आल्याची टीका होताना पाहायला मिळत आहे. “विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना तुम्ही घाबरताय का?”, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. करोनामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या परीक्षा आणि नियुक्त्यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा मोठा रोष पाहायला मिळत होता. त्यामुळे आयोगाने यावर महत्त्वाची माहिती देणे बंद केले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे.
निकाल, परीक्षांच्या विलंबाचा फटका
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) ढिसाळपणाचा फटका पुन्हा एकदा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना बसला आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करतात मात्र आयोगाकडून वेळेत निकाल जाहीर केला जात नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदा नवीन अभ्यासक्रमानुसार राज्यसेवा परीक्षा घेण्यात आली आहे.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ होऊन तीन महिने झाले तरी अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. वेळेत निकाल जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवली आहे. मात्र खात्रीशीर सूत्रने दिलेला माहितीनुसार, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे २६ ते २८ तारखेपर्यंत राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.
मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी वेळ मिळणारच नाही या तारखांमध्ये हे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.आयोगाच्या या धोरणामुळे मुख्य परीक्षेच्या उंबरठ्यावर असलेल्या उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, यूपीएससीची परीक्षा पद्धत स्वीकारणाऱ्या आयोगाला त्यांची तत्परता का स्वीकारता येत नाही? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. आयोगाच्या अशा दिरंगाई धोरणामुळे ट्विटर बंद करण्यात आल्याचा आरोपही होत आहे.

