नागपूर: सरळसेवा भरतीतील विविध पदांच्या परीक्षा खासगी कंपन्यांकडून घेताना गैरप्रकार होत असल्याने या परीक्षांची जबाबदारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, ज्या आयोगाकडे परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेची जबाबदारी देण्यात आली, त्याच आयोगातील अधिकाऱ्यांचे संबंध अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपर गैरप्रकाराशी असल्याने आयोगाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी एमपीएससीला थेट इशारा देत अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच या पदावर कुणाची नियुक्ती करावी हे सुचवले आहे.

नेमके काय म्हणाले बच्चू कडू

आमदार बच्चू कडू यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही मागणी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या अन्न व औषध निरीक्षक पदभरतीचे पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. MPSC तील ३ अधिकाऱ्यांना अटक देखील झालेली आहे. त्यामुळे आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा. अन्यथा यांच्या राजीनामा साठी मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी तर करणारच आहे. शिवाय MPSC चे अध्यक्ष व सदस्य हे राजकीय संपर्क विरहित असणारेच असावे व सचिव हा मंत्रालय कॅडर चा नियुक्त न करता वरिष्ठ IAS दर्जाचाच असला पाहिजे, यासाठी देखील प्रभावी मागणी करणार आहे. आयोगाच्या सध्याच्या सहसचिव व परीक्षा नियंत्रक यांच्या प्रतिनियुक्ती करिता आयोगाची मान्यता नसताना आयोगाच्या परस्पर मनमानीपणे मंत्रालयातील अधिकारी एकतर्फी पाठविण्याच्या निर्णयाची व यासंदर्भात आयोगाच्या अधिकारी यांनी केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करावी तसेच सदर पदावरील व्यक्तीची नियुक्ती नियम बाह्य असल्याने ती तत्काळ रद्द करावी प्रश्न फुटी संदर्भात प्राथमिक जबाबदारी परीक्षा नियंत्रक यांची असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा गरज पडली तर विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरची  लढाई देखील लढू. पण विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम नक्की करू.

विद्यार्थ्यांकडून तीव्र संताप

सरळसेवा भरतीच्या परीक्षांमध्ये पेपरफुटी, प्रश्नपत्रिका उपलब्ध होणे, परीक्षेतील अनियमितता आदी प्रकारांच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. त्यामुळे खासगी परीक्षा यंत्रणांवरील अवलंबित्व कमी करून सरळसेवा भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा प्रक्रियेबाबतचा विश्वास वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेशी संबंधित गैरप्रकार समोर आल्याने विद्यार्थ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. परीक्षा प्रक्रियेतील गोपनीयता, प्रश्नपत्रिकेची सुरक्षितता आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी याबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ‘खासगी यंत्रणांऐवजी एमपीएससीकडे जबाबदारी देऊनही गैरप्रकार होत असतील, तर परीक्षेची विश्वासार्हता नेमकी कुठे सुरक्षित आहे?, असा सवाल स्पर्धा परीक्षार्थींकडून उपस्थित केला जात आहे. पेपरफुटीच्या आरोपांमुळे आधीच परीक्षार्थींच्या मनात अस्वस्थता असताना एमपीएससीशी संबंधित प्रकरण समोर आल्याने आयोगाच्या कार्यपद्धतीकडे आता अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.

२०१८ ते २०२६ मधील प्रमुख वादग्रस्त परीक्षा

वर्ष – परीक्षा – काय घडले?

२०१८ – महाराष्ट्र टीईटी – तपासादरम्यान गुणांमध्ये फेरफार व गैरव्यवहार उघड

२०२० – महाराष्ट्र टीईटी – ओएमआर व सॉफ्टवेअरमध्ये फेरफार करून गुण वाढवल्याचा आरोप; अनेक अटकेत

२०२१ – आरोग्य विभाग गट-क – परीक्षा होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका बाहेर आल्याचा आरोप

२०२१ – आरोग्य विभाग गट-ड – कथित पेपरफुटीनंतर परीक्षा रद्द; पुन्हा घेण्यात आली

२०२१ – म्हाडा भरती – कथित पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द करून नव्याने प्रक्रिया

२०२६ – महाराष्ट्र टीईटी परीक्षा – पूर्वसंध्येला प्रश्नपत्रिका जप्त; परीक्षा पुढे ढकलली; एसआयटी तपास सुरू

२०२६ – एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षा – पेपरफुटीचे आरोप; चौकशीची मागणी, अधिकृत निष्कर्ष अद्याप प्रलंबित