बुलढाणा :  महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा कारभार आणि पेपर फुटीवरून राज्यात वादळ निर्माण झाले आहे. यावरून विरोधी पक्षांनी राज्यात रान उठविले असून पुणे येथे विध्यार्थ्यांचे (उमेदवारांचे)  ठिय्या आंदोलन सुरु आहे. यामुळे एन विधानपरिषद निवडणुकीच्या काळात घमासान सुरु असताना शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणा विधानसभा मतदारसंघांचे आक्रमक आमदार संजय गायकवाड यांनी आज एमपीएससीचा एकूण कारभार, कार्यपद्धती, वारंवार होणारे पेपरफुटीचे प्रकार यावर गंभीर सवाल उपस्थित करीत आरोपांचे बॉम्बच टाकले आहे. हा राज्यातील महायुती सरकारला घरचा अहेर समजला जात असून  यामुळे राज्यात वादंगाचे महावादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

काय आहे मागणी?

बुलढाणा येथील आपल्या जन संपर्क कार्यालयात रविवारी आमदार गायकवाड यांनी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी सोबत संवाद साधला. भरगच्च पत्र परिषदेत बोलतांना त्यांनी केवळ एमपीएससी चे अध्यक्षच नव्हे तर सर्व सदस्य यांना बरखास्त करण्याची मागणी करुन एकच खळबळ उडवून दिली.  अध्यक्षच नव्हे बहुतेक सदस्यांचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा आरोप करुन मेरिट विध्यार्थ्यांचे होणारे नुकसान, त्यांचे अडचणीत आलेले भवितव्य लक्षात घेता आपण जवाबदारीने हे विधान, ही मागणी करीत असल्याचे ते म्हणाले. मी सरकारमध्ये असलो, सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो तरी सत्य बाहेर येणे, सत्य जाहीर करणे काळाची गरज आहे. आपण यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार करणार असल्याचे आमदार गायकवाड यांनी ठणकावून सांगितले.

‘त्या’  सदस्यांची सखोल चौकशी करा’

यावेळी आमदार गायकवाड यांनी छत्रपती संभाजीनगरशी संबंधित एमपीएससीच्या सदस्यावर गंभीर आरोप करून त्यांची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी  केली. मागील २०१८ पासून ते आजतागायत हे  राज्य लोकसेवा आयोगात सदस्य म्हणून कार्यरत आहे. हे सर्व दीर्घ काळ सदस्य म्हणून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात  कथितरित्या मोठे घोळ झाल्याचा  गंभीर आरोप गायकवाड यांनी केला. या सदस्यांची कोट्यवाधीची संपत्ती असून त्यांच्या दूरध्वनीचे ‘सीडीआर’  तपासण्याची आणि संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी गायकवाड यांनी केली.  या सदस्यांचा मोठा प्रभाव असून त्यांच्या ईशाऱ्यावर ठराविक लोकांकडेच उमेदवारांचे पेपर तपासणी करिता जातात असा आरोपही आमदारांनी केला. त्यामुळे पेपर फूट सारखा पेपर तपासणीचा देखील मोठा घोळ असल्याचे ते म्हणाले.

उमेदवारांचा आक्रोश योग्यच दरम्यान यावेळी पुढे बोलतांना संजय गायकवाड यांनी आपल्या आरोपांचे समर्थन करतानाच  एमपी एस सी उमेदवारांच्या आंदोलनाचे खुले समर्थन केले. ही आंदोलने नसून  हा अहोरात्र परिश्रम करणाऱ्या कुशाग्र उमेदवारांचा आक्रोश, त्यांच्या वेदना असल्याचे ते म्हणाले.