नागपूर : एमपीएससी परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज तिरंगा चौक, सक्करदरा येथे आंदोलन करीत विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. या वेळी विद्यार्थ्यांनी लक्षवेधी फलक हातात घेत आयोगाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
‘लग्न ठरलं, आयोगाने मोडलं’
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी हातात घेतलेल्या फलकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘लग्न ठरलं, आयोगाने मोडलं’, ‘अबे पोट्टे हो, जिंदगी झाली बरबाद’, तसेच ‘एमपीएससी अध्यक्षाला करा आता बाद’, अशा आशयाचे फलक विद्यार्थ्यांनी झळकविले. परीक्षेतील अनिश्चितता आणि कथित पेपरफुटीचा विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होत असल्याचे यातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी
पेपरफुटीच्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षाव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. एमपीएससी अध्यक्षांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी केली. तसेच परीक्षांची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याची सरकारने हमी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
‘२०२७ पासून राज्यसेवा परीक्षा वस्तुनिष्ठ करा’
एमपीएससी राज्यसेवा परीक्षा २०२७ पासूनच वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. परीक्षा पद्धती, वेळापत्रक आणि भरती प्रक्रियेबाबत स्पष्टता असावी, अशी अपेक्षाही आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना सातत्याने नियोजन करता यावे, यासाठी वेळापत्रक निश्चित असावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
ग्रुप ‘क’मध्ये २० हजार पदांची भरती
एमपीएससी ग्रुप ‘क’ची २०२६ मधील भरती २० हजार पदांवर करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. सरकारी सेवांमधील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रियेला गती देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
परीक्षांच्या तारखा तातडीने जाहीर करा
३ जानेवारी २०२७ रोजी नियोजित परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. तसेच एमपीएससी ग्रुप ‘ब’ मुख्य परीक्षा २०२६ आणि ग्रुप ‘क’ मुख्य परीक्षा २०२६ यांच्या तारखा लवकरात लवकर जाहीर कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. परीक्षा वेळापत्रकातील अनिश्चिततेमुळे विद्यार्थ्यांच्या तयारीवर परिणाम होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. विविध मागण्यांचे फलक हातात घेत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली.
