नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा २०२५ ची विशेष तपास पथकाच्या( एसआयटी) माध्यमातून चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. त्यानंतर एमपीएससीमध्ये विविध घडामोडी घडल्या आहेत. एसआयटीच्या माध्यमातून होणाऱ्या चौकशीमध्ये पुन्हा काही अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. आयोगातील विविध परीक्षा आणि मुलाखतींमध्ये अध्यक्ष आणि सदस्यांची भूमिका महत्वाची असती. त्यामुळे ही समिती केवळ एका परीक्षेचा अभ्यास करणार नसून मागील काही वर्षातील परीक्षांची तपासणी करणार असल्याची माहिती आहे. त्यात कुठल्या अध्यक्षावर कारवाईची सुई आहे बघा.

तत्कालीन अध्यक्ष आणि काही सदस्यही चौकशीच्या फेरीत ?

एमपीएससी औषध निरीक्षक गट-ब परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणामुळे आयोगाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जानेवारी २०२६मध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण समोर आले असताना त्या कालावधीत आयोगाचे सदस्य डॉ. अभय वाघ यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार होता. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ती अंतिम करून छपाईसाठी पाठवण्यापर्यंतची प्रक्रिया अत्यंत गोपनीय असते. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या प्राध्यापकांची निवड, त्यांच्याकडून प्रश्नसंच मागवणे, त्यातील प्रश्नसंचाची निवड आणि अंतिम प्रश्नपत्रिका छपाईसाठी पाठवणे, या प्रत्येक टप्प्यावर आयोगाच्या अध्यक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे तत्कालीन अध्यक्ष आणि काही सदस्यही या चौकशीमध्ये गुंतण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले

राज्य लोकसवा आयोगाकडून गेल्या दोन वर्षात घेण्यात आलेल्या विविध पदभरतीच्या परिक्षांचे पेपर फुटल्यावरुन आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी राज्यभरातील उमेदवारांनी आंदोलन सुरु केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या राज्यभरातून आलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा केली. त्यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधत सर्व मागण्या मान्य केल्या. यानंतर आता एसआयटी चौकशी होणार असल्याने अनेक गोष्टी पुढे येणार आहेत.

पुन्हा कुणाला अटक होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वर्तुळात खळबळजनक आणि मोठी घडामोड समोर येणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील ‘औषध निरीक्षक, गट-ब’ या पदाच्या चाळणी परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात थेट आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाच सहभाग असल्याचे उघड झाले. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने या प्रकरणी मोठी कारवाई करत आयोगाच्या अवर सचिवांसह एकूण सहा जणांना अटक केली होती. त्यानंतर आता एसआयटी चौकशी झाल्यावर पुन्हा काही लोकांना अटक होणार का याकडे लक्ष लागले आहे.