नागपूर: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे त्यांच्या धडक कारवायामुळे रोज चर्चेत असतात. उच्च न्यायालयाने त्यांच्या काही कारवायांवर नाराजी व्यक्त केली आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या कार्याला पाठिंबा दिला आहे. तुकाराम मुंढे यांच्या बेधडक कारवायांमुळे सोशल मीडियावर त्यांना सिंघम, नायक अशी विशेषणे जोडली जात आहेत. आता मुंढे यांच्याकडे एमपीएससी संदर्भात नवीन जबाबदारी देण्यात आलेली आहे. सरकारने न्यायालयीन चौकशी समितीमध्ये मुंढे यांचे नियुक्ती का केली, त्याची काय कारणे आहेत, यामध्ये सरकारची काय खेळी आहे, हे जाणून घेणे या निमित्ताने महत्त्वाचे ठरते.

मुंढे यांच्याकडे काय जबाबदारी राहणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी आयोगाची स्थापना करण्यात येणार असून, आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची, तर सचिवपदी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे,’ अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी केली. चौकशी दोन महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रस्ताव असून, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आणि २०२७ मधील गट-क परीक्षेतील पदसंख्या दुप्पट करण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मुंढे यांच्या नावाची घोषणा होताच विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच या समितीचे स्वागतही केले.

मुंढे यांच्या निवडीची कारणे काय ?

तुकाराम मुंढे यांचे एमपीएससीच्या सचिव पदे निवड करावी अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. एमपीएससीच्या सचिव पदाची जबाबदारी घेण्यास अनेक आयएएस अधिकाऱ्यांचा नकार आहे. मंत्रालयातील उपसचिव दर्जाचे अनेक अधिकारी हे जबाबदारी घेण्यास नकार देत आहेत. परिणामी सचिव पद अनेक महिने रिक्त राहते. यापूर्वीही चार महिने सचिव पदावर कोणाचेही नियुक्ती झालेले नव्हती. सध्या राज्य सरकारने सचिवांना त्यांच्या पूर्व पदावर पाठवलेले आहे. त्यामुळे हे पद पुन्हा रिक्त झाले आहे. तसेच एमपीएससीमधील पेपरफुटीची घटना बाहेर आल्यावर पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांना सचिव करा अशी मागणी केली जात होती.यातूनच मुंढे यांच्याकडे न्यायालयीन चौकशी समितीची जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा आहे.

विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध असल्याने समितीमध्ये महत्त्व

तुकाराम मुंढे यांच्याबद्दल गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं चर्चा होत असलेली पाहायला मिळते. अनेकदा त्याचं कारण हे जवळपास सारखंच असतं. ते कारण म्हणजे एका विभागातून नव्या विभागात झालेली बदली आणि त्याठिकाणी त्यांनी सुरू केलेली धडक कारवाई. नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या आक्रमक आणि पारदर्शक कार्यशैलीमुळे त्यांच्या कारकिर्दीत अनेक वेळा बदल्या झाल्या आहेत. यावेळी मे महिन्यात तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून अन्न व औषध प्रशासन म्हणजे FDA च्या आयुक्त पदी बदली झाली होती. या पदाचा पदभार स्वीकारताच मुंढेंनी आक्रमकपणे कारवाईला सुरुवात केली. त्यांनी राज्यभर फसव्या जाहिरातींसह केमिकलचा वापर, भेसळयुक्त खवा, तूप, बनावट औषधं आणि अवैध गुटख्याचा साठा जप्त करत त्यांनी अनेक दुकानं सील केली, त्यामुळं ते चर्चेत आहेत.त्यामुळे त्यांच्यावर विद्यार्थ्यांचा विश्वास असल्याने या समितीमध्ये त्यांना स्थान देण्यात आले आहे.