नागपूर: नगरपालिका आणि नगर पंचायतींचे २ आणि २० डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची मतमोजणी ही एकत्रित २१ डिसेंबरला होणार आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र गट ‘ब’ अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २१ डिसेंबरला होणार होती. जिल्हा पातळीवर परीक्षेची संपूर्ण जबाबदारी ही जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाकडे असते. जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल विभागातील सर्व कर्मचारी हे २१ डिसेंबरला मतमोजणीत व्यस्त राहणार आहे. त्यामुळे २१ डिसेंबरची संयुक्त पूर्व परीक्षा होणार की पुन्हा पुढे ढकलली जाणार? असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला हाेता. यावर आता अंतिम एमपीएससीच्या पत्राने मिळाले आहे. २१ डिसेंबरची परीक्षा पुढे ढकलली असून आता ४ जानेवारीला परीक्षा होणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय), राज्य कर निरीक्षक (एसटीआय) आणि सहायक कक्ष अधिकारी (एएसओ) यासाठी संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाते. यंदा ६७४ पदांसाठी जाहिरात देण्यात आली. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी ३, राज्य कर निरीक्षक २७९ पदे आणि पोलीस उपनिरीक्षकाच्या ३९२ पदांचा समावेश आहे. सुरुवातीला संयुक्त पूर्व गट ‘ब’ २०२५ (अराजपात्रित) परीक्षा ९ नोव्हेंबरला होणार होती. मात्र, महाराष्ट्राच्या काही भागात आलेल्या पूर परिस्थितीमुळे राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली. ती परीक्षा नोव्हेंबर महिन्यात झाल्याने त्याचा परिणाम संयुक्त पूर्व परीक्षेवर झाला. यानंतर २१ डिसेंबरला संयुक्त पूर्व परीक्षा घेण्याचा निर्णय झाला.
निवडणूक आयोगाने सुरुवातीला २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणीची तयारी केली होती. मात्र, न्यायलयीन खटल्यांचा पेच निर्माण झाल्याने तेथील मंगळवारी होणारी काही पालिकांमधील निवडणूक २० डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे २ आणि २० डिसेंबर रोजी मिळून दोन्ही टप्प्यांतले मतदान पार पडल्यानंतर सर्व नगरपालिका व नगर पंचायतींचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्व महसुली अधिकारी मतमोजणीच्या प्रक्रियेत व्यस्त राहणार असल्याने ‘एमपीएससी’ २१ डिसेंबरला परीक्षा घेणार की पुन्हा पुढे ढकलणार? असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला होता.
आयोगाने परिपत्रकात दिले हे कारण
(१) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ (जाहिरात क्रमांक ११७/२०२५)
(२) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ (जाहिरात क्रमांक १२४/२०२५)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ च्या परीक्षेचे आयोजन दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० या कालावधीत करण्यात आले होते. तथापि, राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका २०२५ कार्यक्रमांतर्गत राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक ०२ डिसेंबर, २०२५ रोजीच्या आदेशानुसार मतमोजणी दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी करण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना निर्देशित केले आहे. आयोगामार्फत आयोजित परीक्षा व मतमोजणी एकाच दिवशी म्हणजेच दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी असल्याने त्यासंदर्भात काही मुद्यांच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून माहिती मागविण्यात आली होती.
आयोगाने उपरोक्तप्रमाणे मागविलेल्या माहितीच्या अनुषंगाने काही जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्र व मतमोजणीचे ठिकाण यामधील कमी अंतर, लाऊडस्पीकरचा आवाज, वाहतूक कोंडी, परीक्षेदरम्यान निघणाऱ्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, तसेच परीक्षेच्या आयोजनाकरीता कर्मचा-यांची कमतरता इत्यादी बाबी विचारात घेवून त्यांनी परीक्षा आयोजित करण्यास अडचणी उद्भवू शकतात असे कळविले आहे. सदर वस्तुस्थिती विचारात घेता प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.
३. सदर निर्णयानुसार विषयांकित दोन्ही परीक्षेचा सुधारित दिनांक खालीलप्रमाणे राहील :- महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ दिनांक ०४ जानेवारी, २०२६ होणार. तर महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ दिनांक ११ जानेवारी, २०२६ होणार आहे.
