MPSC Answer Key 2026 : नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३१ मे, २०२६ रोजी घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२६’ या स्पर्धा परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या एका दिवसानंतरच उत्तर तालिका जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. त्यावरून आता हरपाळकर पॅटर्नचे चर्चा सुरू झालेली आहे काय आहे संपूर्ण प्रकार पाहूया.
नवीन धोरणाचा परिणाम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा आणि त्यांचे निकाल दरवर्षी लांबत असल्याने आयोगावर सर्व स्तरातून प्रचंड टीका होते. अनेकदा राज्य सरकार आणि विविध लोकप्रतिनिधी ही एमपीएससीवर टीका करत असतात. एमपीएससीच्या दिरंगाईमुळे अनेकदा विधिमंडळाचे अधिवेशन ही गाजते. मात्र आता राज्य सरकारने एमपीएससीच्या विविध परीक्षा आणि निकालांना गती देण्यासाठी नवीन धोरण आखले आहे. यासाठी सुसूत्रताबद्ध कार्यक्रमही तयार करण्यात आला आहे. याचाच परिणाम की काय म्हणून आयोगाच्या परीक्षा आणि निकालाला गती मिळाली आहे.
म्हणून बसला धक्का
राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ घेतली गेली. यूपीएससीच्या धर्तीवर बदललेल्या नव्या पॅटर्ननुसार होणारी ही दुसरी परीक्षा आहे. या परीक्षेसाठी आयोगाने उमेदवारांसाठी अत्यंत कडक नियमावली आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळवण्यासाठी मूळ हॉल तिकीट, ओळखपत्राची मूळ प्रत आणि छायांकित प्रत आणणे बंधनकारक होते. तसेच वेळेचे तंतोतंत पालन न करणाऱ्या आणि गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांवर कायमस्वरूपी बंदी घातली जाऊ शकते. रविवारी ही परीक्षा घेण्यात आली असून सोमवार एक जूनला याची उत्तर तालिका जाहीर करण्यात आली आहे. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी उत्तर तालिका जाहीर करण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ असल्याने विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय.
सचिवांचे अभिनंदन
एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची नियुक्ती होताच त्यांनी निकाल आणि परीक्षेच्या कामांना गती दिली आहे. अनेक रखडलेल्या परीक्षांचे निकालही जाहीर होण्यास सुरुवात झालेली आहे. नागरी सेवा पूर्व परीक्षेचे उत्तर तालिका एका दिवसात जाहीर करण्यामागे महेंद्र हरपाळकर यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे एमपीएससीमध्ये आता हरपाळकर पॅटर्न सुरू झाल्याची चर्चा विद्यार्थ्यांच्या विविध टेलिग्राम ग्रुप वर आहे. तसेच अनेक विद्यार्थी यासाठी सचिवांचे अभिनंदन करत आहेत.
या तारखेपर्यंत हरकती नोंदवता येणार
- प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावरील दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार केवळ ऑनलाईन पध्दतीने व विहित शुल्काचा भरणा करुन हरकती सादर करणे आवश्यक आहे.
- विहित ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने /पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती तसेच विहित शुल्काचा भरणा न केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
- उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ०६ जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
- ऑनलाईन पध्दतीने हरकती सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा केंद्राच्या १८००-१२३४-२७५ व ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर तसेच support-online@mpsc.gov.in या ईमेलवरुन विहित कालावधीत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.
