नागपूर: महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) परीक्षा पद्धतीत सर्वात क्रांतीकारी आणि ऐतिहासिक बदल जाहीर केले होते. यात ऑनलाईन परीक्षेसह सन २०२७ पासून ‘राज्य सेवा, गट-ब आणि गट-क’ या महत्त्वाच्या पूर्व परीक्षा वर्षातून दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा आयोजित केल्या जाणार होत्या. मात्र आयोगाने आता ऑनलाइन परीक्षा तूर्तास रद्द करण्यास वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याच्या निर्णयामध्येही मोठा बदल केला आहे. आयोगाकडून केलेला नेमका बदल काय आणि याचे कारण काय पाहूया.

सुरुवातीला कुठला निर्णय घेतला होता

सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या तिन्ही परीक्षा वर्षातून केवळ एकदाच घेतल्या जातात. या परीक्षांना दरवर्षी लाखो उमेदवार बसतात. मात्र, जागांच्या मर्यादित संख्येमुळे बहुतांश उमेदवारांना मुख्य परीक्षेची पात्रता मिळवता येत नाही. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवरील अनावश्यक ताण कमी करण्यासाठी आणि त्यांना यशाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोगाने पूर्व परीक्षा वर्षातून एक पेक्षा अधिक वेळा घेण्याचा निर्णय घेतला होता. या नव्या रचनेनुसार, आता पारंपरिक ओएमआर शीट (OMR Sheet) म्हणजेच पेन-पेपर पद्धतीऐवजी संगणकावर आधारित ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test – CBT) घेतली जाणार होती.

आयोगाने नेमका काय बदल केला

आयोगाने संदर्भ क्रमांक १ येथे नमूद दिनांक २५ जून, २०२६ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सन २०२७ पासून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातून दोन किंवा अधिक वेळा संगणक प्रणालीवर आधारित (CBT) पद्धतीने आयोजित करण्याबाबत जाहीर केले होते. दरम्यान, विविध उमेदवारांकडून प्रस्तुत परीक्षा प्रचलित पद्धतीने (Offline) OMR आधारीत घेण्यासंदर्भात प्राप्त झालेली निवेदने विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातून दोन किंवा अधिक वेळा संगणक प्रणालीवर आधारित (CBT) पद्धतीने आयोजित करण्याबाबतचा निर्णय जुलै, २०२७ पर्यंत स्थगित करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.

आयोगाचे माजी सदस्य काय म्हणतात

आयोगाचे माजी सदस्य दयानंद मेश्राम यांनी त्याच्या ट्विटरवर सांगितले की, प्रवेश परीक्षांचा उद्देश विद्यापीठ/महाविद्यालयीन शैक्षणिक उपक्रमांत प्रवेशासाठी पात्रता निश्चितीचा तर स्पर्धा परीक्षांचा शैक्षणिक उपक्रम यशस्विरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांच्या लोकसेवांसाठी व्यावसायिक तयारीच्या मूल्यांकनाचा.जास्त संख्येत उपलब्ध जागांसाठी प्रवेश परीक्षा तर तुुलनेेने सिमीत जागांसाठी स्पर्धा परीक्षा.भिन्न उद्दिष्टे व मुुलभूूत निकषांवर परीक्षा योजना, अभ्यासक्रम व व्यक्तिमत्त्व चाचणीचे स्वरुप ठरण्याने दोहोंमधे नैैसर्गिक व व्यवहार्य तफावत. तुलनेत गल्लत करत गुुणवर्धनाची संधी देण्यास्तव दोन वा जास्त वेळा पूर्वपरीक्षा घेण्यात कालापव्ययाने एकीकडे MPSC चे वेळापत्रक कोलमडण्याची भिती तर वाढीव सत्रांमुळे गुुणांंचे प्रमाणीकरण व मध्यमीकरणाच्या क्लिष्टतेने दुुसरीकडे परीक्षार्थींमधे शंकांची उत्पत्ती!