नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) राज्यसेवा २०२४ परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी ३० ऑक्टोबर २०२५ ला तर तात्पुरती निवड यादी ५ जानेवारी २०२६ प्रसिद्ध होऊन तीन महिन्यांचा कालावधी झाल्यावरही अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली न्हवती. निवड प्रक्रियेतून बाहेर पडणे, वैद्यकीय तपासणी या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अंतिम निवड यादी जाहीर न झाल्याने नियुक्त्या रखडल्या होत्या.
त्यामुळे भावी अधिकाऱ्यांमध्ये एमपीएससी प्रशासनाविरोधात असंतोष होता. अखेर एमपीएससी सचिवांनी यात पुढाकार घेऊन निकाल वेळेत जाहीर केला. याबद्दल राज्यसेवा २०२४ च्या विद्यार्थ्यांकडून सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या विषयी आभार व्यक्त करण्यात आले. राज्यसेवा २०२४ च्या विद्यार्थ्यांनी निकालासाठी आणि दिवस प्रयत्न केले. यानंतर आयोगाच्या सचिवांनी केलेल्या प्रयत्नामुळे निकाल जाहीर झाला.
त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांची भेट घेतली. एमपीएससी सचिव महेंद्र हरपाळकर यांची भेट घेऊन राज्यसेवा २०२४ चा अंतिम निकाल वेळेत लावल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच परीक्षा प्रक्रिया गतिमान करण्याबाबत विनंती केली असता, इथून पुढे मेगा भरती करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आयोगाचा कारभार जलद करण्यात येईल.
जाहिराती पासून नऊ महिन्यात परीक्षा प्रक्रिया संपवून प्रक्रिया जलद करण्याचा करण्याचा आयोगाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आयोग नेहमी विद्यार्थी हिताचाच विचार करते व पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे देखील यावेळी सचिवांनी आवर्जून सांगितले.
असा विलंब झाला होता
राज्यसेवा २०२४ च्या भरती प्रक्रियेची जाहिरात २९ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर १ डिसेंबर २०२३ रोजी पूर्वपरीक्षा, १२ मार्च २०२५ रोजी पूर्वपरीक्षेचा निकाल, तर २७ ते २९ मे २०२५ दरम्यान मुख्य परीक्षा पार पडली. मुख्य परीक्षेचा निकाल ९ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर १७ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या.
३० ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि ५ जानेवारी २०२६ रोजी तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. दरम्यान, निवड यादीतून बाहेर पडणे आणि वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतरही अंतिम गुणवत्ता यादी आणि अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेली नाही, अशी उमेदवारांची तक्रार होती. यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया जवळपास दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लांबल्याने त्याचा उमेदवारांवर मानसिक आणि आर्थिक परिणाम झाला.
८ एप्रिलला निकाल जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा अयोगातर्फे (एमपीएससी) २७ ते २९ मे, २०२५ या कालावधीत घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ चा अंतिम निकाल ८ एप्रिल, २०२६ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार विविध २० संवर्गातील एकूण ४६१ पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे. या परीक्षेमध्ये सोलापूर जिल्हातील विजय नागनाथ लामकाने हे सर्वसाधारण तथा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम तर सोलापूर जिल्हातील आरती परमेश्वर जाधव या महिलांमधून राज्यात प्रथम आल्या आहेत.
