नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राज्यसेवा २०२४ परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी ३० ऑक्टोबर २०२५ ला तर तात्पुरती निवड यादी ५ जानेवारी २०२६ प्रसिद्ध होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाल्यावरही अद्याप अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली नाही. निवड प्रक्रियेतून बाहेर पडणे, वैद्यकीय तपासणी या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अंतिम निवड यादी जाहीर न झाल्याने नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यामुळे भावी अधिकाऱ्यांमध्ये एमपीएससी प्रशासनाविरोधात असंतोष आहे. यासंदर्भात माहिती मिळाली असून १८ ते २२ मार्च दरम्यान निकाल जाहीर होणार असल्याची माहिती एमपीएससीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
डिसेंबर २०२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या परीक्षेची जाहिरात आता दोन वर्षे पूर्ण झाली, तरी अंतिम निवड यादीची प्रतीक्षा संपलेली नाही. राज्यातील लाखो विद्यार्थी ‘एमपीएससी’च्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार अशा विविध पदांवर नियुक्ती होईल, या अपेक्षेने पुणे, नागपूर, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये परीक्षेची तयारी करतात. यासाठी प्रचंड आर्थिक भारही सहन करतात. मात्र त्यांना कायम प्रशासकीय दिरंगाईचा फटका सहन करावा लागतो.
राज्यसेवा २०२४ च्या भरती प्रक्रियेची जाहिरात २९ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर १ डिसेंबर २०२३ रोजी पूर्वपरीक्षा, १२ मार्च २०२५ रोजी पूर्वपरीक्षेचा निकाल, तर २७ ते २९ मे २०२५ दरम्यान मुख्य परीक्षा पार पडली. मुख्य परीक्षेचा निकाल ९ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर १७ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि ५ जानेवारी २०२६ रोजी तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली.
दरम्यान, निवड यादीतून बाहेर पडणे आणि वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतरही अंतिम गुणवत्ता यादी आणि अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेली नाही, अशी उमेदवारांची तक्रार आहे. यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया जवळपास दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लांबली असून त्याचा उमेदवारांवर मानसिक आणि आर्थिक परिणाम होत असल्याची चर्चा उमेदवारांमध्ये आहे.
उमेदवारांच्या उपजीविकेचाही प्रश्न
अनेक उमेदवार अल्पभूधारक, अल्प उत्पन्न किंवा सामाजिक-आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधून येत असल्याने हा विलंब त्यांच्या उपजीविकेवरही परिणाम करतो. तसेच प्रशिक्षण आणि पुढील नियुक्त्या रखडल्याने शासनातील रिक्त पदांचा प्रश्नही अधिक गंभीर होतो, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल आणि अंतिम गुणवत्ता यादी तात्काळ जाहीर करून निवड उमेदवारांची शिफारस सामान्य प्रशासन विभागाकडे करावी, अशी मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे.
नेहमीच्या विलंबामुळे परीक्षार्थींमध्ये नैराश्य येत आहे. आयोगाने प्रत्येक परीक्षेची एक कालामर्यादा ठरवून देणे आवश्यक आहे. तात्काळ निकाल जाहीर न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही.
-उमेश कोर्राम, स्टुटंड राईट्स असोसिएशन
काही तांत्रिक अडचणी असल्याने त्या सोडवणे सुरू आहे. निकाल लवकर जाहीर व्हावा यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे काही दिवसांतच निकाल जाहीर करून पुढील प्रक्रिया सुरू होईल.
-महेंद्र हरपाळकर, सचिव, एमपीएससी.
